बहादूरशेख नाका ते सती दरम्यान गुहागर-विजापूर मार्गावरच अनेक व्यावसायिकांनी ठाण मांडून रस्ता काबीज केला आहे. या राष्ट्रीय महामार्ग मार्गावरील वाढती रहदारी, रस्त्यावरील अतिक्रमणे यामुळे सातत्याने अपघात घडत आहेत. अतिक्रमणाच्या विळख्यातून राष्ट्रीय महामार्ग मोकळा करावा, पोलिस प्रशासनाने नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी खेर्डीतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यावर धडक दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने यांना निवेदन दिले. उपविभागीय पोलिस अधिकारी राजमाने यांच्याशी चर्चा करताना पदाधिकारी म्हणाले, खेडर्डीत राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची गती मोठ्या प्रमाणात वाढली असून गेल्या सहा महिन्यात वाहक चालकांच्या चुकीमुळे नाहक ३-४ ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला.
२१ ला सकाळी ७ वाजता माळेवाडीतील हॉटेलसमोर एसटीने डाव्या बाजूच्या भाजी दुकानासमोर उभ्या असलेल्या तरुणाला धडक दिली. यामध्ये अनिकेत विजय दाभोळकर याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या एसटीचालकावर कारवाई करावी, खेडों बहादूरशेख नाका ते सतीपर्यंत रहदारी खूप असल्यामुळे गाड्यांचा वेग ३० ते ४० पर्यंत असावा, त्यासाठी खेर्डी दत्तवाडी चौकात व खेडर्डी वरची पेठमध्ये सीसीटीव्ही सारखी यंत्रणा बसवून वेगाने जाणाऱ्या गाड्यांना दंड आकारण्यात यावा. खेर्डी बाजारपेठेत एक पोलिस निरीक्षक, एक पोलिस व एक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी.
वाहतूक चिपळूणप्रमाणे रस्त्याच्या एका बाजूला एक दिवसआड पार्किंग असावे, खेडीं येथील दोन्ही बाजूला बंद वाहने पार्किंग केलेली असतात. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. उपअधीक्षक राजेंद्रकुमार राजमाने व पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी खेर्डी ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटवून कारवाई करावी अशा सूचना दिल्या. निवेदन देताना जयंद्रथ खताते, अनिल दाभोळकर, प्रशांत यादव, नितीन ठसाळे, अजित खताते, काशिनाथ दाते, धनंजय दाभोळकर, दशरथ दाभोळकर, हरिश्चंद्र यादव, दत्ताराम दाभोळकर, अभिजित खताते, अनिल फाळके, रियाज खेरटकर, जितेंद्र दाभोळकर, अभिजित दाभोळकर आदी उपस्थित होते.