शहरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पालिका प्रशासनाने गुरूवारी कारवाईचा बडगा उगारला. दिवसभर केलेल्या या कारवाईने शहरातील रस्त्यांवर बस्तान बांधलेल्या विक्रेत्यांचे चांगलेच दणाणले. या कारवाईमुळे बाजारपेठेतील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला. अतिक्रमण हटाव पथकाने केलेल्या या कारवाईत मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांचे प्रमुख, कामगार सहभागी झाले होते. या कारवाईदरम्यान रस्त्यालगतच्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. शहरात वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे तत्काळ हटवण्यात यावीत, अशा सूचना मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी बैठकीदरम्यान संबंधित विक्रेते, व्यावसायिकांना केल्या होत्या; मात्र व्यावसायिकांमध्ये काहीच बदल झाला नाही.
दिवसेंदिवस अतिक्रमणांचा विळखा वाढतच होता. याबाबत व्यावसायिकांना समज देऊनही रस्त्यावरच ठाण मांडून असल्याने गुरूवारपासून प्रत्यक्षात ही अतिक्रमण विरोधातील कारवाई हाती घेण्यात आली. सकाळपासूनच शहरातील भाजीमंडई, भेंडीनाका या परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, मंगेश पेढांबकर, अतिक्रमण हटाव पथकाचे संदेश टोपरे, विनायक सावंत, सचिन शिंदे, रमेश कोरवी, नगर अभियंता प्रणव खताळ, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, वलिद वांगडे, राजेश जाधव, संतोष शिंदे यांच्यासह सफाई कामगार व कर्मचारी सहभागी झाले होते.
या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या मालाचा पालिकेच्या आवारात ढीग पडला होता. डंपर व जेसीबी अशा यंत्रणेमार्फत शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवण्यात आली. अनेक व्यावसायिकांनी आपल्या टपरीभोवती लाकडी शेड उभारल्या होत्या. त्या तोडण्यात आल्या. काही हातगाड्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे काही व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.