रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेने जिंकला होता. त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळावी, असा आम्ही दावा केला आहे; मात्र याबाबतचे सर्वस्वी अधिकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असून, महायुतीचा उमेदवार हा तब्बल अडीच ते तीन लाखांच्या फरकाने निवडून येईल, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केला. किरण सामंत यांनी रवींद्र चव्हाण यांना पाठिंबा देण्याबाबत वक्तव्य केले तरी आम्ही आमचा दावा सोडला नाही. पाठिंबा देण्यात वावगे काय, असेही ते म्हणाले. राजापूर येथे होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्याच्या निमित्ताने नियोजन सभेसाठी श्री. सामंत आज सावंतवाडीत आले होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार तथा रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघाचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, रुपेश पावसकर आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, ‘रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी राजापूर येथे ८ रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान मेळावा होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. या मतदारसंघावर आम्ही दावा केला आहे. कारण हा मतदारसंघ यापूर्वी शिवसेनेने जिंकला होता. या ठिकाणी असलेली शिवसेनेची ताकद लक्षात घेता येथे आम्ही उमेदवारी मागितली आहे.
परंतु, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारच निर्णय घेतील. श्री. चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्यास किरण सामंत यांनी त्यांना पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले. त्यात वावगे असे काहीच नाही. पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले म्हणजे आम्ही या मतदारसंघावरच्या दावा अजिबात सोडलेला नाही.’ आमदार नाईकांनी वक्तव्य खरे करून दाखवावे पाणबुडी प्रकल्पावरून आमदार वैभव नाईक यांनी केलेली टीका आणि आंदोलन करण्याची घेतलेली भूमिका लक्षात घेता, माझी त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी केलेले वक्तव्य खरे करून दाखवावे.