एक मराठा… लाख मराठा…., आमचं तुमचं नाते काय….. जय जय जिजाऊ….. जय शिवराय, अरे कोण म्हणतो देणार नाय…. घेतल्याशिवाय राहणार नाय.. जरांगे पाटीलांचा विजय असो…आशा गगनभेदी घोषणा देत चिपळूणार मराठा बांधवांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून राज्य सरकारने तसा अध्यादेश काढल्याने चिपळूण मधील मराठा बांधवांनी एकत्र येत जोरदार जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणा आणि पेढे वाटून यावेळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा समाजासाठी आज आनंदाचा दिवस असून कोकणातील मराठा बांधवांना देखील याचा लाभ मिळणार आहे. परंतु जो पर्यंत मराठा समाजातील प्रत्येक घटकाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
शुक्रवारी मध्यरात्री सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करत तसा सरकारी अध्यादेश काढला आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा देखील केली. साहजिकच समस्त मराठा समाजाने जल्लोष करण्यास सुरुवात केली. त्याचे पडसाद तात्काळ चिपळूणमध्ये चिपळूण मधील उद्योजक प्रकाश देशमुख तसेच पत्रकार सतीश कदम, सुबोध सावंत देसाई, कपिल शिर्के यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव चिपळूण येथील महामार्गावर एकत्र आले होते. महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. मनोज जरांगे पाटील यांच्या बॅनर समोर येऊन त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
एक मराठा… लाख मराठा…., आमचं तुमचं नाते काय….. जय जय जिजाऊ,… जय शिवराय,… अरे कोण म्हणतो देणार नाय…. घेतल्याशिवाय राहणार नाय… जरांगे पाटीलांचा विजय असो… आशा गगनभेदी घोषणा देत मराठा बधवांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. यावेळी प्रकांश देशमुख म्हणाले कोकणातील मराठा बांधवाना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही असा जो गैरसमज पसरवण्यात आला होता तो सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे दूर होणार आहे. कुणबी नोंदी नसलेल्यांना आरक्षण मिळणार नसले तरी ओबीसीच्या सर्व सवलती मिळणार आहेत. तसेच नोकरीत देखील जागा राखीव ठेवली जाणार आहे. तसे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. सतीश कदम म्हणाले आज खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर समस्त मराठा बांधवानी जो प्रदीर्घ लढा दिला त्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.