तालुक्यातील निवळी कातळवाडी येथे जयराम मोरे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीमध्ये बिबट्या घुसला. पहाटे ४.१० वाजणेच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने सर्वांचीच झोप उडाली. वन विभागाने या बिबट्याला काही वेळातच पिंजऱ्यामध्ये सुखरुप जेरबंद केले आणि सर्वांनीच सुटकेला निःश्वास सोडला. बिबट्या घरामध्ये शिरल्याचा सुगावा लागताच जयराम मोरे यांच्या कुटुंबियांनी या बाबतची माहिती तत्काळ निवळीच्या पोलिस पाटलांना दिली. त्यांनी सावर्डेच्या वनपालांना खबर दिली. काही वेळातच वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली.
त्यानंतर बिबट्या हा कोंबड्याच्या वासाने राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीमध्ये बसला असल्याचे दिसून आले. या खोलीचा दरवाजा अर्ध्याभागावर लाकडी फळ्या व पत्र्याने बंद करुन समोर पिंजरा लावला. त्यानंतर काही वेळातच बिबट्या बाहेर पळण्याच्या प्रयत्नात पिंजऱ्यामध्ये सुखरुप जेरबंद झाला. त्यानंतर पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. हा बिबट्या साधारणपणे २.५ ते ३ वर्षाचा व मादी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तो सुस्थितीत असल्याची खात्री करून् या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. दरम्यान, भरवस्तीत बिबट्या शिरल्याने निवळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या बचावकार्यात विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री कीर, अधिनस्त कर्मचारी उमेश आखाडे, अनंत मंत्रे, अश्विनी जाधव, वनरक्षक दत्ताराम सुर्वे, राहूल गुंठे, वाहनचालक नंदकुमार कदम, गणेश भागडे तसेच रेस्क्यू बचाव पथकामध्ये पोलीस विभागाचे अधिकारी, स्थानिक व ग्रामस्थ उपस्थित होते.