वाशिष्ठी नदीतील गाळ उपसण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी टप्याटप्याने दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी चिपळूण बचाव समितीला दिले. त्याचबरोबर नगरपालिका हद्दीत आरक्षण पडलेल्या मात्र ताब्यात नसलेल्या जागा मालकांची एनओसी घेऊन तेथे जलसंपदाकडून स्वखर्खाने गाळ साठा करण्यासही परवानगी दिली असल्याची माहिती समिती पदाधिकाऱ्यांनी दिली. शहरातील वाशिष्ठी नदीत जलसंपदाकडून गाळ उपसा सुरू झाला असला तरी सद्यस्थितीत काढलेला गाळ टाकण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने उपसा थंडावला आहे.
एकूणच चिपळूणच्या गाळमुक्त अभियानात उद्भवणाऱ्या समस्यांसदर्भात शनिवारी बचाव समिती पदाधिकाऱ्यानी अॅड. हर्षद भडभडे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यासमवेत पालकमंत्री सामंत यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत शहरात आरक्षण पडलेल्या जागा या नगरपालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आरक्षण पडलेल्या जागांच्या मालकांची एनओसी घेऊन शासकीय खचनि त्या जागांत गाळ टाकावा. जेणेकरून नगरपालिकेच्या ताब्यात आल्यानंतर या जागांवरील साठवणूक केलेल्या गाळाचा उपयोग होईल.
गाळ उपशासाठी २० कोटींचा निधी टप्प्याटप्प्याने उप्लब्ध करून दिला जाईल. यासंदर्भात लवकरच स्थानिक आमदार शेखर निकम व माजी आमदार सदानंद चव्हाण यांना सोबत घेऊन चिपळूण पूरमुक्तकरिता निधी व अनेक महत्वाचे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी राजेश वाजे, शाहनवाज शाह, किशोर रेडीज, उदय ओतारी आदी उपस्थित होते.