नही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी, डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणा देत लांजा नगरपंचायत परिसर कोत्रेवाडी ग्रामस्थांनी दणाणून सोडला. डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द होण्यासाठी नगरपंचायतीवर छेडलेल्या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लांजा नगरपंचायतीमार्फत कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे; मात्र हा प्रकल्प लोकवस्तीपासून अवघ्या ८० मीटर अंतरावर असल्याने येथील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला असून, या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
तरीही नगरपंचायत प्रशासनाकडून गेल्या साडेतीन वर्षांपासून कोत्रेवाडी येथील प्रकल्प प्रस्तावित जागा रद्द केलेली नाही. या पार्श्वभूमीवर कोत्रेवाडी ग्रामस्थांनी माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर धडक मोर्चा नेला. भाजप कार्यालयापासून ते नगरपंचायतीपर्यंत जोरदार घोषणाबाजी करत ग्रामस्थ नगरपंचायतीवर धडकले. मुख्याधिकारी यांच्या दालनात बाळ माने, नगरसेवक संजय यादव व अन्य पदाधिकारी यांनी चर्चा केली.
नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये ग्रामस्थ आणि मुख्याधिकारी यांची बैठक झाली. ग्रामस्थांनी आपली बाजू मांडली. साडेतीन वर्षे एकाच जागेवर नगरपंचायत का अडून बसली आहे? त्याचप्रमाणे जिल्हा समितीने नाकारलेल्या प्रस्तावापैकी एक असलेला कोत्रेवाडी येथील प्रस्ताव डम्पिंगसाठी नगरपंचायत प्रशासनाने कसा काय स्वीकारला ? असे प्रश्न उपस्थित केले. नगरसेवक संजय यादव यांनी सांगितले, कोत्रेवाडी येथे कचरा टाकण्यासाठी गाड्या गेल्या तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे प्रशासनाने आपल्या भूमिकेत बदल करावा.