तालुक्यात हातभट्टीची गावठी दारू जोमात असल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांच्या कारवाईतून हा प्रकार उघडकीस आला आहे. चिपळूण, सावर्डे, अलोर – शिरगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अवघ्या तीन ते चार दिवसांत पाचजणांवर अवैधरित्या गावठी दारू बाळगणे, हातभट्टी लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी गावठी दारू विक्रीचे धंदें – राजरोसपणे सुरू असतानाही ते उत्पादन शुल्क विभागाच्या नजरेस पडत नाहीत, याचेच आश्चर्य व्यक्त होत आहे. हातभट्टीची गावठी दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीला शासनाकडूनच बंदी आहे. असे असतानाही पैशांच्या हव्यासापोटी अनेकजण नियम धाब्यावर बसवून गावठी दारू तयार करण्याबरोबरच तिची अवैधरित्या विक्रीही करताना दिसून येत आहेत.
ग्रामीण भागात अशा दारूची विक्री केंद्र अधिक आहेत. काहीजण आपल्या घरामध्ये, घराच्या पाठीमागील बाजूस, झाडाझुडपात, नदीकिनारी, निर्जनस्थळी असे प्रकार बेधडकपणे करीत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांत गावठी दारू संदर्भात पाच गुन्ह्यांची नोंद सावर्डे, चिपळूण आणि अलोर-शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हेही दाखल झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या कारवाईनंतरही या गावठी दारू विक्रीला चाप बसलेला नाही. ९ फेब्रुवारीला सायंकाळी पोफळी शिर्केवाडी येथील कारवाईत पोलिसांनी पाचशे रुपयांच्या किमतीची ९ लिटर गावठी दारू जप्त केली. या प्रकरणात एकावर अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापसाळ मोरेवाडी येथे केलेल्या कारवाईत सातशे रुपयांची १४ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.