कोकणात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या समाजात अनेक सुशिक्षित व्यावसायिक, उद्योजक आणि मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्तेदेखील आहेत, परंतु राजकीय क्षेत्रात मुस्लिम समाज अनेक राजकीय पक्षात विखुरला गेला आहे. परंतु कोकणात येथील तरुणांना गेल्या अनेक वर्षात मोठ्या पदावर संधी देण्यात आलेली नाही. पंचायत समि ती, जिल्हापरिषद इथपर्यंतच मुस्लिम कार्यकत्यांना मर्यादित ठेवण्यात आले. त्यामुळे आता राजकीय क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मुस्लिम समाज एकत्र येत असल्याचे समोर येत आहे.
मुंबईत महत्वपूर्ण बैठक – नुकतीच मुंबई येथे मुस्लिम समाज बांधवांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्याबाबत चर्चा करण्यात आली. कोकणात मुस्लिम समाजाला राजकारणात विशेष प्रतिनिधित्व दिले जात नाही. एखाददुसरे पक्षाचे पद किंवा पंचायत समिती जिल्हापरिषदेत उमेदवारी देऊन समजूत काढली जाते. त्यामुळे आता शांत न बसता पुढे जाण्यासाठी एकत्रपणे काम करण्याची गरज असून त्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहन देखील या बैठकीत करण्यात आले.
फक्त काँग्रेस अपवाद – कोकणातील या तिन्ही जिल्ह्यात काँग्रेसं पक्षाचा अपवाद वगळता कोणत्याही पक्षाने मुस्लिम समाजाला संधी दिलेली नाही. रायगड म धून बॅ. अंतुले यांना लोकसभा तसेच विधानसभेत देखील काँग्रेसने उमेदवारी दिली होती. तर रत्नागिरी जिल्ह्यात हुसेन दलवाई, मुसा मोडक, एम.डी. नाईक, महंमद रखांगी यांना देखील काँग्रेसने उमेदवारी दिली होती. हा अपवाद वगळता गेल्या ३० वर्षात कोणत्याच पक्षाने मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे यावेळी संधी मिळाली पाहिजे अशी मागणी देखील अनेकांनी बैठकीत केली.
लोकसभा, विधानसभा द्या – कोकणात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. तर तिन्ही जिल्ह्यात १५ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी एका ‘लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी तसेच एका विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजातील तरुणाला उमेदवारी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. बैठकीत यावर एकमतदेखील झाले. मात्र उमेदवारी मागताना सर्व पक्षांचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.
पक्षप्रमुखांच्या भेटी घेणार – या मागणीसाठी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रमुख अजित दादा पवार, वंचितचे प्रकाश आंबेडकर अशा प्रमुख नेत्यांच्या भेटी घेण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला. तसेच मुंबईत झालेल्या बैठकीची माहिती कोकणातील गावागावात पोचवण्यासाठी देखील यावेळी नियोजन करण्यात आले. परदेशात असलेल्या मुस्लिम तरुणांना देखील याबाबत माहिती देण्यात आली असून त्यांनी देखील पूर्ण पाठिंबा दर्शवला असल्याचे करण्यात आले आहे.