‘भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा निलेश राणे यांनी उघड केला आहे. विरोधकांना संपवून टाकण्याचे त्यांचे धोरण आहे आणि तेच निलेश राणेंनी गुहागरच्या सभेत स्पष्ट केलेले आहे. मला खतम करून त्यांना हा वाद संपवायचा आहे का? अशीच शंका आता येत आहे. पण भास्कर जाधवांना संपवणे तितके सोपे नाही. माझा एकएक कार्यकर्ता छातीचा कोट करून तुमच्याबरोबर संघर्ष करेल हे लक्षात ठेवा. आता जबाबदारी गृहविभागाची व येथील पोलिसांची आहे. जर पोलिसांनी योग्य ती पावले उचलली नाहीत तर मी थेट रस्त्यावर उतरून न्याय मागेन’, आशा शब्दांत शिवसेना नेते आम, भास्कर जाधव यांनी आपली भूमिका शनिवारी एका पत्रकार परिषदेत मांडली.
राडा करण्यासाठी आले – शुक्रवारी झालेला राडा आणि गुहागरमधील शृंगारतळी येथील निलेश राणे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आम. भास्कर जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषद बोलावून सविस्तरपणे आपली प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. प्रत्यक्षात निलेश राणे हे राडा करण्यासाठीच चिपळूणमध्ये आले होते, हे सीसीटीव्ही फुटेज बघता स्पष्ट झालेले आहे. गाड्यांच्या डिकीमधून खोके भरून त्यांनी दगडी आणलेल्या होत्या. मिरवणुकीत जे लोक होते ते सर्व बाहेरचे होते. त्यांच्याकरवी त्यांनी दगडफेक करायला लावली. गाड्या फोडा, असे निलेश राणे स्वतः सांगत होते हे देखील फुटेजमध्ये दिसत आहे, असा दावा करताना पूर्वनियोजित कट करून निलेश राणे चिपळूणमध्ये आले होते, असा थेट आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. पोलीस काय करत होते?
प्रत्यक्षात पोलिसांनी महामार्गावर स्वागत करण्याची परवानगी दिलीच कशी? कोणत्या नियमाखाली दिली? अनेकवेळा सांगून देखील पोलिसांनी माझे ऐकले नाही. हा हल्ला होणार हे पोलिसांना माहित होते. तरी देखील त्यांनी बघ्याची भूमिका घेऊन माझ्याच कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नळकांड्या जाणूनबुजून आमच्याच बाजूला फोडल्या आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांना धुमशान घालण्यासाठी मोकळे सोडले, असा थेट आरोप आ. भास्कर जाधव यांनी केला. पोलिसांनी जर महामार्गवर परवानगीच दिली नसती किंवा त्यांना थेट सभेच्या ठिकाणी पाठवून दिले असते तर काहीच घडले नसते. त्यामुळे जे घडले त्याला पोलीसदेखील जबाबदार आहेत, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
शिव्यांची सभा होती का? – माजी खासदार निलेश राणेंच्या सभेबद्दल आम. जाधव म्हणाले, त्यांची सभा बघून लाज वाटावी असे चित्र होते. फक्त शिव्या आणि शिव्याच होत्या. आई-बहिणीवरून जाहीर सभेत शिवीगाळ करता… हीच संस्कृती का? भाजपने ही संस्कृती पाळली आहे? विनय नातू यांच्यासारखी व्यक्ती व्यासपीठावर बसून टाळ्या वाजवते? अरे काय हे? भारतीय जनता पार्टी इतक्या खालच्या दर्जाचे राजकारण करायला लागली आहे का? भाजपम धील जुन्याजाणत्या लोकांना आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांनातरी हे पटले का? याचे उत्तर फडणवीसांनी द्यावे, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी आपला संताप व्यक्त केला.