मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा शनिवारी (दि. २४) एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहने सोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेऊन काम वेगाने सुरू होते. कोकणातील शिगमोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना कोकणात दाखल होण्याची परवानगी देण्यात आली असली तरी, मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी कशेडी घाटाचा वापर करावा लागणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून चाचणी घेऊन अखेर शनिवारपासून मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक ही कशेडी बोगद्यातून वळवण्यात आली आहे.
कशेडी बोगदा हा २ किलोमीटर लांबीचा असून या ठिकाणी ४० किलोमीटर प्रति तास एवढी वेग मर्यादा वाहनांनी पाळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. कोकणातील शिमगोत्सव सणापूर्वी सरकारने कशेडी बोगदा किमान एकेरी ‘वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्याने कोकणवासीयांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीमध्ये बोगद्यातून वाहतूक मुंबईहून गोव्याच्या दिशेने एकेरी सुरू करण्यात आली होती. त्याचप्रकारे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. लहान वाहने प्रति तास ४० किलोमीटर वेगाने या बोगद्यातून रायगडमधून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होऊ लागली आहेत.
लवकरच एसटी व खासगी आराम बस यांना देखील बोगद्यातून येण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत असून ती मार्च महिन्यात सरकार पूर्ण करणार का, याची उत्सुकता आहे. २० एप्रिल २०२४ अखेर कशेडी बोगदा दुतर्फा होणार खुला बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात मुंबईकर चाकरमान्यांसाठी कशेडी बोगदा मुंबईकडून येताना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, गणेश विसर्जनानंतर तो बंद झाला. आतापर्यंत कशेडी बोगद्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत कशेडी बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी ‘खुला होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे म्हणणे आहे.
त्यामुळे चाकरमान्यांना आजही कशेडी घाटातून प्रवास करावा लागत असून, बोगदा खुला होण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरण कामात कशेडी घाटाला पर्याय म्हणून दोन बोगदे काढण्यात आले. बोगद्याच्या आतील कामे ८० टक्के पूर्ण झाली असून, रस्त्यांचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर बाजूचा केवळ अर्धा किलोमीटर भागातील एक पूल वगळता भोगावपर्यंत तर रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी घाटातील खवटीपर्यंत चारपदरी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
त्यामुळे २० एप्रिल २०२४ अखेर दोन्ही बोगद्यातून वाहतूक सुरू करता येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिलीङ्ग पोलादपूर म्हणजे रायगड जिल्यातील ७० मीटरचा पुल व १२० मीटरचा पुलाचे ३०ते ३५ टक्के काम बाकी असून ते ३१ मार्च पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती कार्यकारी अभियंता नीरज चौरे उपअभियंता गोसावी अभियंता माडकर यांनी दिली आहे.