भक्कम अशी एकजूट दाखवत महाविकास आघाडीने चिपळूणमध्ये ‘हर घर मशाल’ हे अभियान सुरू केले आहे. शहरातील भैरी मंदिरात श्रीफळ वाढवून या मशाल अभियान प्रचाराला सुरुवात करण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासाठी आघाडीकडून थेट प्रत्येक घरात संपर्क करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याला पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त असा प्रतिसाद देखील मिळाला आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात अशाप्रकारे प्रचार करण्यात येणार असल्याची माहिती आघाडीकडून देण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आता होणार आहे.
महाविकास आघाडीकडून खासदार विनायक राऊत यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली असून महायुतीकडून केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. विनायक राऊत यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. जिल्हापरिषद गट निहाय पदाधिकारी बैठका त्यानंतर पंचायत समिती गण निहाय खळा बैठका, आघाडीचा संयुक्त मेळावा या माध्यमातून विनायक राऊत यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे. तर आता प्रचाराचा पुढील टप्पा सुरू करण्यात आला आहे. डोअर टू डोअर प्रचार चिपळूणमध्ये महाविकास आघाडीकडून आता ‘डोअर टू डोअर’ प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी माजी आमदार रमेश कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली ‘हर घर मशाल’ हे अभियान सुरू करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत यादव, तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, काँग्रेस शहराध्यक्ष लियाकत शहा, आघाडीचे समन्वयक शिरीष काटकर, राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रईस अलवी, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद झगडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे, शहरप्रमुख शशिकांत मोदी यांच्यासह आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीची एकजूट – विशेष म्हणजे महाविकास आघाडीची भक्कम अशी एकजूट यावेळी दिसून येत होती. तर महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शहरात प्रचार सुरू होताच एक मोठी रॅली निघाल्याचे चित्र रस्त्यावरून दिसून येत होते. यावेळी महिला प्रत्येक घरात जाऊन म शाल निशाणीची ओळख करून देताना दिसत होते. सकाळपासून दुपारपर्यंत हा ‘डोअर टू डोअर’ प्रचार सुरू होता. तर सायंकाळी त्याच प्रभागात बैठक असे नियोजन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे.