संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आपल्या काळात ८० वेळा संविधान बदलले. संविधानात बदल करण्याचे भाजपच्या सूतराम डोक्यात नाही; परंतु संविधान बदलण्यावर काँग्रेसने बोलूच नये, असा पलटवार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सहानुभूतीचा कोणालाही फायदा होणार नाही. लोकांना विकास हवा आहे तो मोदींच्या काळात झाला असल्याचे सांगितले. तावडे म्हणाले, भाजप आणि मोदी सरकारने संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी संविधानाची प्रत समोर ठेवून भाजपने संकल्पपत्र घोषित केले. संविधानात बदल करण्याचे भाजपच्या सूतराम डोक्यात नाही; मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवारच अशा प्रकारची भाषा करत आहेत. करवाटपात महाराष्ट्राला मिळालेला अधिकचा वाटा, अनुदानात मिळालेली अधिकची रक्कम ११ हजार ७११ कोटी रुपये बिनव्याजी कर्ज केंद्राने महाराष्ट्राला दिले.
काँग्रेस एका बाजूला रोजगार नाही, असे म्हणत आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपने पंतप्रधान आवास योजनेतून ४ कोटी घरे बांधली. ही घरे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खिशातून बांधली नाहीत. त्यासाठी लागलेल्या साहित्यात हजारो व लाखो लोकांना रोजगार मिळाला. पीएम आवासमध्ये २७ लाख घरे महाराष्ट्राला दिली, शौचालय बांधली आहेत. आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड दिले आहे, अन्नधान्य दिले जात आहे, असे तावडे यांनी सांगितले.
खालच्या पातळीवरील प्रचार वेदनादायी – पहिल्या टप्प्यात भाजपला अपेक्षित मतदान झाले आहे. आम्ही चांगल्या जागा मिळवू. लोकसभेचा राज्यात जो प्रचार सुरू आहे तो राज्याच्या हितासाठी अपेक्षित नाही. कोण नाच्या म्हणतो, कोणी काही म्हणतो हे शोभनीय नाही, अशा राजकीय स्तरावर जाऊन प्रचार करणे मनाला वेदना देणारे आहे, अशी खंत विनोद तावडे यांनी बोलून दाखवली.