27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeRatnagiriकुर्धे परिसरातील पाइपलाइनसाठीचे खड्डे ठरताहेत जीवघेणे

कुर्धे परिसरातील पाइपलाइनसाठीचे खड्डे ठरताहेत जीवघेणे

अनेक भागांमध्ये खोदण्यात आलेला भाग अजूनही बुजवलेला नाही.

रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळपाणी योजना मंजूर झाली आहे. सव्वाकोटीचा निधी मंजूर झाला असून, सहा महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात झाली. पाइपलाइन टाकण्यासाठी गावात ठिकठिकाणी चर खोदण्यात आली होती. ती अद्यापही बुजवलेली नाही. परिसरात फिरणारी जनावरे आणि माणसांना ती धोकादायक ठरत आहेत. तेथील काम तातडीने पूर्ण करून खड्डे भरावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जलजीवनअंतर्गत नळपाणी योजनेचे काम कुर्धे येथे केले जात आहे.

मागील वर्षी मे महिन्यामध्ये या योजनेकरिता दोन विंधन विहिरी खोदण्यात आल्या होत्या. नोव्हेंबरपासून या योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये साठवण टाकीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक घरात नळ देण्यासाठी या कातळावरील भागात पाइपलाइन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली; परंतु खोदाईनंतर पाइपलाइन टाकण्यात आली. अनेक भागांमध्ये खोदण्यात आलेला भाग अजूनही बुजवलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे उघडे आहेत. हे काम असेच ठेवून ठेकेदार गायब झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. या परिसरात फिरणाऱ्यांना याचा त्रास होत आहे.

दुर्घटना घडण्याची भीती आहे. तसेच विंधन विहीर व पाण्याची टाकी तयार झाली आहे तर उर्वरित काम अपुरे कसे ठेवले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीने संबंधित ठेकेदाराला जाब विचारला पाहिजे, असे ग्रामस्थांचे मत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने संबंधितांवर कारवाई करून पाणी योजना सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular