आधीच उत्पन्न घटलेले आणि आंब्याचा कमालीचा घसरलेला दर यामुळे आंबा बागायतदार चिंताक्रांत झालेले आहेत. त्यामध्ये आता गतवर्षी ४०-४५ रुपये प्रतिकिलो असणारा आंबा कॅनिंगचा दर यावर्षी निम्म्यावर म्हणजे २५-२७ रुपयांवर आल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे. बागायतदारांचे पुरते कंबरडे मोडले आहे. या साऱ्यातून हंगामासाठी केलेला खर्च भागवायचा कसा? बँकेची कर्जफेड कशी करायची? अशी चिंता आंबा बागायतदारांना भेडसावत आहे. यावर्षी सातत्याने प्रतिकूल हवामान राहिल्याने हापूसचे कमालीचे उत्पन्न घटले आहे.
आंब्यासाठी वारंवार करावी लागलेली फवारणी, खतांची मात्रा आदींसाठी करावा लागणारा खर्च मिळणाऱ्या उत्पन्नातून भागणार की नाही? अशी चिंता बागायतदारांसह व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे; मात्र, हापूस आंब्याच्या हंगामाच्या सुरवातीपासून चांगलाच दर मिळाला; मात्र, गेल्या काही दिवसांपासून आंब्याच्या पेटीच्या दरामध्ये कमालीची घसरण झाली आहे. २४००-२५०० रुपये पेटीला असलेला दर गेल्या काही दिवसांपासून १४००-१५०० रुपयांवर येऊन ठेपला आहे.
मे महिन्यामध्ये आंबा हंगाम अंतिम टप्प्यामध्ये राहणार असल्याने सध्याच्या दरामध्ये आणखीनच घसरण होण्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून वर्तवली जात आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आंबा कॅनिंगलचा चांगलाच दर मिळण्याची आशा बागायतदारांना होती; मात्र तीही फेल ठरली आहे.