पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे आंबा बागेत रखवाली करणारे दोन गुरखे मंगळवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले दिसून आले. हा खून असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि मोठा फौजफाटा काही क्षणात डोंगरातील आंबा बागेत दाखल झाला. सहा महिन्यापूर्वी आले मिळालेल्या माहितीनुसार भक्त बहादूर थापा (वय ६०) व लल्लन बहादूर थापा (वय ५५) हे दोघे सख्खे भाऊ असून सहा महिन्यापूर्वी ते रखवालीच्या कामासाठी रत्नागिरीत आले. गोळप येथील मुदस्सर मुकादम यांच्या बागेत रखवालीचे काम त्यांना मिळाले. हे दोघेही एकाच ठिकाणी रहात होते व रखवालीचे काम करीत होते.
एकाचवेळी दोघांचा खून – सोमवारी दिवसभर रखवालीचे काम करत दोघेही भाऊ रात्रीच्यावेळी जेवण करून झोपण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी रात्रीच्या सुमारास अज्ञाताने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला.
धारदार शस्त्राचे घाव – पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भक्त बहादूर थापा व लल्लन बहादूर थापा यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. दोघांच्या डोक्यात शस्त्राचे घाव घातले होते. एकाच्या कपाळावर तर दुसऱ्याच्या डोक्यावर शस्त्राचा घाव होता. पोलिसांनी घटनास्थळावरून एक धारदार शस्त्र हस्तगत केले आहे.
छातीवर चिरा फेकला – घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेला एक चिरा मिळून आला. दोघांच्या छातीवर चिरा घालून त्यांना गंभीर जखमी केले असावे असा कयास पोलिसांनी वर्तविला आहे. घटनास्थळावरून रक्ताने माखलेला चिरादेखील पोलिसांनी हस्तगत केला आहे तर अन्य ठिकाणी पडलेले रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
मचाणाच्या बांबूवर रक्त – पावस बायपास रस्त्यानजीक एका डोंगरावर असलेल्या या बागेत दोघेही भाऊ रखवाली करीत होते त्या ठिकाणी एक मचाण बांधले आहे. मचाणावर झोपण्यासाठी बिछाना अंथरलेला होता. या मचाणावर जाण्यासाठी बांबू बांधून शिडी करण्यात आली आहे. त्यातील एका बांबूवर रक्ताचे डाग दसून आले.
डॉग घुटमळला – या दुहेरी खुनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ श्वान पथकाला पाचारण केले. परिसरात शोधमोहिम देखील पोलिसांनी राबवली. पोलिसांचे श्वान बागेत माग काढत धावत सुटले मात्र काही वेळाने ते श्वान त्याच परिसरात घुटमळले. पोलिसांनी परिसरातील काही पुरावे गोळा करण्यासाठी जादा कुमक मागवून घेतली.
अनेक गुरंखे चौकशीसाठी ताब्यात – दोन नेपाळी सख्ख्या भावांचा खून झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. डिवायएसपी निलेश माईणकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच पूर्णगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी आजूबाजूच्या बागांमध्ये काम करणाऱ्या नेपाळी गुरख्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
खुनाचा गुन्हा दाखल – या डबल मर्डरमुळे रत्नागिरीत खळबळ माजली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा पूर्णगड पोलीस स्थानकात दाखल केला आहे. दरम्यान, या दोन्ही भावांचा खून कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस संशयिताच्या मागावर आहेत. याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डिवायएसपी निलेश माईणकर करीत आहेत.