राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बैठक घेऊन केंद्राकडून निधी उपलब्ध करून चिपळूणचा रेड व ब्लू लाईनचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सोमवारी सायंकाळी चिपळूणमध्ये आयोजित महायुतीच्या सभेमध्ये बोलताना चिपळूणवासी यांना दिले. लोकसभेची ही निवडणूक देशाच्या प्रगतीसाठी, विकसित भारतासाठी महत्त्वाची आहे. देशातील महिला, युवा, शेतकरी गरीब माणूस या सर्वांच्या उत्कर्षासाठी ही निवडणूक असून देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना विराजमान करण्याची जनतेसाठी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
‘अब की बार मोदी तडीपार’ म्हणणाऱ्या यांची कुवत काय? मोदी यांनी मनात आणले तर यांना २४ तासांत तडीपार करू शकतात, असा टोला देखील त्यांनी लगावला. महायुतीची प्रचारसभा चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राबाहेरील मैदानावर सोमवारी सायंकाळी महायुतीची जाहीर प्रचार सभा झाली. यावेळी नारायण राणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोरोना काळात मोदींनी देशात लस निर्माण करून लोकांचे जीव वाचवले. परदेशात देखील लस पाठवली. कोरोनामुळे कारखाने बंद पडले. देशातील जनतेची उपासमार होऊ नये म्हणून ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले. आजही देत आहेत. आणखी ५ वर्षे सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारत – ना. नारायण राणे म्हणाले की, मोदींनी देशातील जनतेला विविध ५४ योजना दिल्या. आपल्या खात्यातून आपण लोकांना ३५ ते ९० टक्के सबसिडी दिली. मी खात्याचा पदभार स्वीकारला तेंव्हा केवळ १३ टक्के महिला उद्योजक होत्या. आता २९ टक्के महिला उद्योजक बनल्या आहेत. मोदीजींनी अन्नधान्य, पाणी, घरे दिली. राहुलजीच्या काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना दुरुस्ती केली. मोदी जाती, धर्मावर बोलत नाहीत. ते महिला, शेतकरी, युवा, गरीबमाणूस यांच्याबद्दल बोलतात. दहा वर्षात मोदींनी आत्म निर्भर, विकसित भारत बनवला, असा दावा राणेंनी केला.