23.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriकोकण मंडळ सलग १३ वेळा राज्यात अव्वल

कोकण मंडळ सलग १३ वेळा राज्यात अव्वल

कोकण विभागीय मंडळाचा निकाल राज्यात अव्वल म्हणजे ९७.५१ टक्के लागला आहे.

बारावीच्या परीक्षेत कोकणच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सलग तेराव्या वर्षी महाराष्ट्रात बाजी मारली आहे. फेब्रुवारी- मार्चमध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी १ वाजता जांहीर झाला. कोकण विभागीय मंडळाचा निकाल राज्यात अव्वल म्हणजे ९७.५१ टक्के लागला आहे. नेहमीपेक्षा यावेळी निकाल खूपच लवकर लागला असून, आता पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होणार आहे. गतवर्षी मंडळाचा निकाल ९६.०१ टक्के लागला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत मंडळाचा निकाल १.५ टक्के एवढा जास्त लागला आहे. कोकण मंडळातून १२३९० मुलगे उत्तीर्ण झाले व मुली १२७६३ उत्तीर्ण झाल्या.

मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.४२ टक्के व त्यापेक्षा २.१८ टक्के जास्त मुलींचे प्रमाण ९८.६० टक्के आहे. नेहमीप्रमाणे मुलींनी या परीक्षेत अव्वल स्थान मिळवले आहे, अशी माहिती कोकण विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष महेश चोधे व प्रभारी सचिव सुवर्णा सावंत यांनी दिली. कोकण मंडळात २२७२ विद्यार्थी ७५ टक्के व व पुढे ८४२६ विद्यार्थी ६० टक्के व पुढे ११७८३ विद्यार्थी ४५ टक्के व पुढे आणि २६७२ विद्यार्थी ३५ टक्के व पुढे गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १५४ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९४ अशा २४८ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अनुक्रमे ३८ व २३ अशी ६१ मुख्य परीक्षा केंद्रे होती.

नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९७.५१ टक्के लागला आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ८०.३० टक्के लागला. यात रत्नागिरी जिल्ह्यातील ६९० पैकी ५४२ विद्यार्थी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२४ पैकी १९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण मंडळात रत्नागिरी जिल्ह्यात गैरमार्ग प्रकरणांची संख्या वाढली आहे. यंदा ९ प्रकरणे घडली व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही प्रकरण घडले नाही. गेल्या वर्षी रत्नागिरीत फक्त १ गैरमार्ग प्रकरण घडले होते. गुणपडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रतिसाठी २२ मे ते ५ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून, त्यासाठी शुल्क आकारणी केली जाईल.

श्रेणीसुधार, पुरवणी परीक्षा – बारावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह बसून उत्तीर्ण होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. तसेच जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी २७ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच सूचना जाहीर करण्यात येईल.

RELATED ARTICLES

Most Popular