आरजू टेक्सोल कंपनीच्या अटक करण्यात आलेल्या संशयितांनी राजकीय पक्षांशी निगडित असल्याचा कांगावा सुरू केला आहे. असे असेल तर आहे त्यापेक्षा मोठी कारवाई त्यांच्यावर करा. नागरिकांनी अशा कंपन्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, ही पद्धत आता बंद करा. कंपनीने सुमारे १०० कोटींची फसवणूक केल्याचे समजते. नागरिकांना पैसे परत मिळण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. विवेक हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, आरजू टेक्सोल कंपनीकडून मोठी फसवणूक झाल्याची माहिती पुढे आली.
पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी मी याबाबत बोललो. कंपनीने गुंतवणूकदारांची सुमारे १०० कोटींच्यावर फसवणूक केल्याचे तपासात पुढे येत आहे. याची व्याप्ती मोठी असून पुण्याशी याचे लागेबांधे आहेत. पुण्यातील कोणी नसले तरी काही संशयित पुण्यात असल्याची माहिती मिळत आहे. पोलिस संशयितांच्या मागावरच असून लवकरच कारवाई होईल; परंतु गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे कसे परत देता येतील यावर पोलिस काम करत आहेत. ही फसवणूक राज्याबाहेर देखील आहे. अशा कंपनीमध्ये आंधळेपणाने विश्वास ठेवून गुंतवणूक करू नये. त्याची माहिती घेऊन गुंतवणूक करावी, असे आवाहन उदय सामंत यांनी केली.
कंपन्यांकडून आधीही फसवणूक यापूर्वी झालेल्या फसवणुकीमध्ये सॅफ्रॉन, कल्पतरू, संचयनी आदी कंपन्यांनी कोट्यवधीची फसवणूक केल्याचा वाईट अनुभव गाठीशी असूनही पुन्हा फसवणूक होणे योग्य नाही. माहिती घेऊन गुंतवणूक करावी, असेही सामंत यानी स्पष्ट केले.