कोकणात सर्पदंशानंतर व्यक्तींना ठराविक वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे दुर्देवी प्रकार यापूर्वीही घडले आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील टोकाचा असलेल्या मंडणगड तालुक्यातील वेळास या ठिकाणी घडली आहे. मुंबईतून मे महिन्याच्या सुट्टीला गावी आलेल्या १३ वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मूळची मंडणगड तालुक्यातील वेळास येथील असलेली मुग्धा राकेश बटावंळे असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. ती विरार येथील इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी होती. बटावळे कुटुंबीय नोकरीनिमित्त मुंबई विरार येथे स्थायिक आहेत. सध्या मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे हे कुटुंब गावाकडे आलं होतं.
दोन दिवसांपूर्वी मुग्धा सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास बाथरूमसाठी घराबाहेर गेली. लहान असलेली मुग्धा घराबाहेर गेली आणि इथेच मोठा घात झाला. याच वेळी तिला काहीतरी पायाला लागलं, मात्र नेमकं काय लागलं हे लहान असलेल्या मुग्धाला समजलं नाही. पायाला लागल्यानंतर ती तशीच घरात आली. तिच्या पायातून रक्त येऊ लागलं, मात्र तिला आपल्या पायाला काटा लागला असेल असा समजून तिने घरच्यांना आपल्याला पुन्हा जरा वेळ झोप येत असल्याचं सांगितलं. मात्र तासभर झाला तरी मुग्धा उठली नाही, म्हणून घरचे उठवायला गेले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तिचा केवळ श्वास सुरू होता. त्याचवेळी घरच्यांच्याही लक्षात आलं. मात्र तोपर्यंत वेळ गेली होती.
काहीतरी गडबड असल्याचं घरच्यांच्याही लक्षात आलं त्यांनी तात्काळ वेळास पासून अर्धा तासाच्या अंतरावर असलेल्या देव्हारे येथील येथील आरोग्य उपकेंद्रात मुग्धाला दाखल केलं. सकाळी साडेदहा पावणेअकराच्या सुमारास तिला आरोग्य केंद्रात आणण्यात आलं. मात्र डॉक्टरनी तपासून तिला मृत घोषित केलं आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. हसती खेळत्या, गावाला आलेल्या मुग्धाला काळाने हिरावून नेलं. बटांवळे आणि चोरगे कुटुंबावर दुः खाचा डोंगर कोसळला. मुंबई परिसराजवळ विरार येथील इंग्लिश मिडीयम स्कूलची असलेली मुग्धाच्या पश्चात आई-वडील, लहान बहीण, आजी, आजोबा, मामा, मामी असं असं मोठ कुटुंब आहे.