26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRajapurराजापूरमध्ये भरधाव ट्रकने मोटार, दुचाकींना उडवले

राजापूरमध्ये भरधाव ट्रकने मोटार, दुचाकींना उडवले

हा अपघात कसा झाला याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

मुंबई-गोवा महामार्गावर गाडगीळवाडी येथील बस थांब्यानजीक गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कोळसावाहू ट्रकने या ठिकाणी उभ्या असलेल्या चार दुचाकी व मोटारीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये एक जण ठार झाला असून, १० जण जखमी झाले आहेत. यातील पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविले आहे. सुदेश चंद्रकांत फाटक (वय ४५, रा. शेढे फाटकवाडी) असे मृताचे नाव आहे. बुधवारी (ता. ५) सायंकाळी ६ वाजता भीषण अपघात झाला. ट्रक उलटल्याने डिझेल टाकी फुटून डिझेल व ऑईल रस्त्यावर पसरल्याने वाहतूक एका बाजूने वळविली होती. उतारावरून वेगाने घसरत येणारा हा ट्रक पाहून अनेक जण सैरावैरा पळू लागले.

गोव्याकडून कोळसा भरून मुंबईकडे जाणारा हा चौदा चाकी मोठा ट्रक महामार्गावर गाडगीळवाडी येथील उतारावरून भरधाव आला. यावेळी बस थांब्यावर काही प्रवासी व काही दुचाकीस्वार थांबले होते. एक मोटार देखील उभी होती. भरधाव आलेल्या ट्रकने तेथे उभ्या असलेल्या चार दुचाकींना व मोटारीला उडवले. वेगाने ट्रक येताच तेथे उभ्या असलेल्या अनेक प्रवाशांनी पळापळ केली. मात्र उभ्या असलेल्या सुदेश चंद्रकांत फाटक यांना जोरदार धडक बसल्याने ते जागीच ठार झाले तर अन्य काही प्रवाशी जखमी झाले. या ट्रकने मोटारीला धडक दिल्याने मोटारमधील विकास रघुनाथ पाडावे, रघुनाथ भगवान पाडावे, रामदास लक्ष्मण दळवी, श्रावणी रामदास दळवी (सर्व रा. कणेरी) हे चौघे गंभीर जखमी झाले.

उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये मिहिर मिलिंद धुळप (वय १३ रा. कोंढेतड) याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या पाचही जणांवर राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण, उपनिरीक्षक मोमीन शेख यांसह कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व अपघातग्रस्तांना मदत केली व पंचनामा केला.

हे आहेत जखमी – किरकोळ जखमींध्ये ट्रक चालक अंबालाल श्रीरामजी बाट (४५), क्लीनर अस्लम खान (उदयपूर) या दोघांसह उभ्या असलेल्या प्रवाशांमधील रेश्मा दिगंबर फाटक, शुभ्रा प्रफुल्ल फाटक (रा. सर्व शेढे फाटकवाडी), सर्वेश उमेश सुर्वे (१८. रा. मुंबई सध्या रा. कोंढेतड) यांचा समावेश आहे. या सर्व जखमींवर राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मोहनिश शिवदे, डॉ. हर्षानी बुरानी यांसह कर्मचाऱ्यांनी उपचार केले.

अपघाताचे कारण अज्ञात – शहरालगत झालेल्या या अपघाची माहिती मिळताच अनेकांनी अपघातस्थळी धाव घेतल्याने गर्दी झाली होती. मात्र हा अपघात कसा झाला याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. भरधाव आलेल्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला की कसा काय याचा पोलिस तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular