विश्वकरंडक विजेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय संघ नव्या उमेदीने आणि नव्या अपेक्षांनी सज्ज होत आहे. या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताची सलामी उद्या आयर्लंडविरुद्ध होत आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या तुलनेत टी२० क्रिकेट प्रकार वेगळा आहे. या प्रकारात कमजोर संघाला दिग्गज संघांना पराभवाचा धक्का देण्याची संधी किंचित जास्त असते. अमेरिकन संघाने सराव सामन्यात बांगलादेशचा केलेला पराभव आणि वेस्ट इंडीजला पपुआ न्यू गिनी संघाने विजयासाठी दिलेली कडवी झुंज नेमके हेच दाखवून गेली आहे. त्याच गोष्टींचा विचार करून भारतीय संघ आयर्लंड संघाविरुद्ध सर्व ताकदीनिशी खेळून दमदार विजयासाठी प्रयत्न करेल.
भारताच्या पहिल्या सामन्यासाठी कमालीचा उत्साह स्थानिक अनिवासी भारतीय प्रेक्षकांत दिसत असताना खेळपट्टी फक्त गोलंदाजांचे लाड करणार नाही ना, अशी शंका खेळाडू आणि चाहत्यांना सतावत आहे. प्रतीक्षा जरी ९ जून रोजी होणाऱ्या भारत वि. पाकिस्तान सामन्याची असली, तरी आयर्लंडसमोरचा सामना कमी महत्त्वाचा नाहीये. ॲण्डी बेलबनीं आणि हॅरी टॅक्टर चांगलेच तगडे आक्रमक फलंदाज आहेत. पॉल स्टर्लिंग आणि डॉकरेलसारखे दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत आणि गोलंदाजीत बऱ्यापैकी विविधता आहे. हे सत्य आहे की भारत आयर्लंडदरम्यान आत्तापर्यंत झालेल्या ८ सामन्यांत एकदाही भारतीय संघ पराभूत झालेला नाही; तरीही रोहित शर्माने कोणतीही गोष्ट गृहीत न धरता तगडा खेळ करायचे आदेश आपल्या खेळाडूंना देईल.
पहिली फलंदाजी करताना श्रीलंकन संघाची उडालेली त्रेधा बघता नासाऊ कौंटी मैदानावरच्या खेळपट्टीच्या स्वभावाचा अंदाज लावला जाऊ शकतो. सराव सामन्यात फलंदाजांना धावा जमा करताना कौशल्य पणाला लावावे लागले होते. मैदानाचे कर्मचारी खेळपट्टी फलंदाजीला पोषक कशी करता येईल, यासाठी त्याचसाठी झटत आहेत. कारण टी२० क्रिकेट प्रकारात सगळ्यांना भरपूर फटकेबाजी बघायची असते. रोहितसह सलामीला कोण येणार, याची उत्सुकता कायम आहे. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीने एकाच वेळी सरावात फलंदाजी केल्याने अंदाज अजून लांबले आहेत. खेळपट्टीच्या स्वभावाचा विचार करता जयस्वाल रोहितसह सलामीला येईल.
प्रथम गोलंदाजीस प्राधान्य – खेळपट्टीचा अंदाज यायला नाणेफेक जिंकणारा कप्तान प्रथम गोलंदाजी करेल, हे स्पष्ट आहे. कामाचा वार असला, तरी भारत वि. आयर्लंड सामन्याला प्रेक्षकांची भरपूर गर्दी होणार आहे. ज्या रसिक प्रेक्षकांना भारत वि. पाकिस्तान सामन्याची तिकिटे मिळाली नाहीत, त्यांनी या चांगल्या सामन्यावर उडी मारली आहे. नासाऊ कौंटीच्या पदाधिकाऱ्यांना रविवारच्या सामन्याची रंगीत तालीमंडा करायची संधी भारत विरुद्ध आयर्लंड सामन्याने मिळणार आहे.