पावसाळ्यात ओढावणाऱ्या उपाय योजना आपत्तीकाळात राबवण्याच्यादृष्टीने संगमेश्वर तालुक्याचा आपत्ती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार ३५ गावे संभाव्य पूरग्रस्त असून, २८ गावे दरडप्रवण म्हणून घोषित केली आहेत. तालुक्यात नदीकिनारी असणारी ११ गावे, खाडीकिनारी असणारी १० गावे आणि धरणाच्या क्षेत्रात असणारी १४ गावे अशी ३५ गावें संभाव्य पूरग्रस्त गावे निश्चित केली आहेत. या ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाल्यास तेथील ग्रामस्थांना जवळच्या शाळा, समाजमंदिर या ठिकाणी तात्पुरते स्थलांतरित करण्याची सोय केली आहे.
पोहणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे तसेच ७ लाइफजॅकेट, १२ लाइफबोया, रोप, टॉर्च आणि पब्लिक अॅड्रेसिंग सिस्टीम, ऑनलाइन सूचना करण्याची व्यवस्था केली आहे. पूरग्रस्त गावांप्रमाणे २८ गावे दरडप्रवण गावे आहेत. सुमारे ३ हजार लोकांना याचा धोका उद्भवू शकणार असल्याचा संभव आहे.
ज्या गावांना पुराचा अधिक धोका आहे तेथील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीस देण्यात आल्या आहेत तसेच खाडीकिनारी असणाऱ्या गावांनाही सतर्कतेच्या आणि स्थलांतराच्या नोटीस देण्यात आली आहे. याबरोबरच आपत्तीकक्ष २४ तास तैनात ठेवण्यात येणार आहे. कुठेही झाड मार्गावर पडले तर ते हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज आहे. त्याचबरोबर मदतकार्यासाठी हेल्प अॅकॅडमीही सज्ज राहणार आहे.