मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत एकाधिकारशाही गाजवून शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. या निवडणुकीत डोक्यात हवा गेलेल्यांना देशातील मतदारांनी जागेवर आणलं आहे. लोकशाहीत जनता हीच सर्वोच्च आहे. जे जनतेला विसरतात ते फार काळ टिकत नाहीत. केंद्रात सत्तेवर आलेले मोदी सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांच्या आभार मेळाव्यात केला. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना गुहागर मतदारसंघातून २७ हजारांचे मताधिक्य मिळाले.
या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे आभार आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्याच्या हेतूने आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. आमदार जाधव म्हणाले, शिवसेना पक्ष आणि चिन्ह चोरले नसते तर त्यांचे चार उमेदवारही खासदार आले नसते. या वेळच्या लोकसभा निवडणुकीत आपण १८ मतदारसंघांत प्रचार केला. तिथे महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. गतवेळी विजयी झालेल्या जागा या निवडणुकीत सोडाव्या लागल्या ही पक्षाची चूक झाली. गुहागर मतदार संघात आपण प्रचाराचे योग्य नियोजन केले होते. आपण मतदारसंघात केवळ चारच सभा घेतल्या तरीही गीतेंना २७ हजाराचे मताधिक्य मिळाले.
राज्यातील ६० आमदारांच्या मतदार संघाची जबाबदारी पक्षाने आपल्यावर सोपवली आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना वाढण्यासाठी आपण आपले कौशल्य पणाला लावणार आहे. गुहागर मतदारसंघात आपल्या विरोधी कोण उमेदवार असेल, असे वाटत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. या मेळाव्यात नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख संजय कदम, प्रभाकर जाधव, जितेंद्र चव्हाण, प्रभाकर कदम यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाने आमदार जाधव यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.