गेल्या २४ तासांपासून महाड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा महाडकरांना तडाखा बसायला सुरूवात झाली आहे. रायगड विभागात राष्ट्रीय महामार्गाचे लाडवली गावाजवळ सुरू असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाल्याने हा मार्ग मागील ७२ तासात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आगामी दोन दिवसात महाड परिसरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान शुक्रवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसाने लाडवली परिसरातील सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाच्या कामाजवळ भरावामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून ते आता पर्यायी महामार्गावरून वाहण्यास सुरुवात झाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून या म ार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून स्थानिक प्रशासनामार्फत तशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान ठेकेदारांचे काम संथ गतीनेच सकाळपासून सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमधून ठेकेदाराच्या कार्यपद्धतीविरोधात पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित ठेकदाराच्या चुकीमुळे रायगड विभागातील नागरिकांना फुकटचा त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराला जर का रस्ता आणि लाडवली पुल ही दोन्ही कामं एकाचवेळी करणं शक्य नव्हतं तर त्याने आधीचा चांगल्या अवस्थेतील पुल पाडायला नको होता. आता महाड-रायगड. मार्गावरील रस्ता आणि लाडवली येथील पुलाचे काम ठप्प झाले आहेच, परंतु संबंधित ठेकेदाराने लाडवली पुलाशेजारी नदीतून जो तात्पुरता आणि पर्यायी रस्ता बनवला आहे, त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी भरत असल्याने महाड शहरातून रायगडकडे आणि रायगड विभागातून महाड शहरात येणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे.