मुंबई- गोवा महामार्गालगत डीबीजे महाविद्यालयाच्या सिद्धांत घाणेकर आवारात असणारी ६० फूट चिऱ्याची भिंत कोसळून झालेल्या अपघातात महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा चिरडून मृत्यू झाला. तब्बल चोवीस तासानंतर त्याचा ढिगाऱ्याखालील मृतदेह बाहेर काढण्यात आला. सिद्धांत प्रदीप घाणेकर १९, मूळ रा. देगाव, ता. दापोली, सध्या रा. लोटे) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. पाऊस आल्याने सिद्धांतने टपरीचा आडोसा घेतला होता; मात्र काही वेळातच त्याच्यावर पाठीमागील चिरा, माती, भराव कोसळ्याने त्याचा हकनाक बळी गेला. विद्यार्थ्याच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवारी (ता. १२) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसामुळे डीबीजे महाविद्यालयाच्या क्रीडांगणालगत असणारी चिऱ्याची भिंत अचानक कोसळली. हे चिरे व भराव कोसळून महामार्गावर आला. यावेळी आसपासच्या विद्यार्थ्यांनी तेथून पळ देखील काढला; मात्र दुर्घटनेआधी पाऊस आला म्हणून सिद्धांत हा महामार्गालगत असलेल्या संरक्षक भिंतीस लागून असलेल्या टपरीच्या आडोशाला थांबला होता. त्याचवेळी वरच्या बाजूने चिऱ्याची भिंत कोसळून तो त्या खाली गाडला गेला. या घटनेनंतर तत्काळ संबंधित ठेकेदाराचे कामगार घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावर आलेले चिरे, माती बाजूला केली आणि ते निघून गेले.
दरम्यान, महाविद्यालय नेहमीप्रमाणे सुरू होते; मात्र सायंकाळ झाल्यानंतर आपला भाचा सिद्धांत घरी न आल्याने मामाने चौकशी सुरू केली. सिद्धांतच्या मित्रांनी डीबीजे महाविद्यालयात शोधाशोध केली. तो लोटे येथे आपल्या मामाकडे राहत होता; मात्र उशिरापर्यंत सिद्धांत घरी न आल्याने अखेर मामाने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर सिद्धांतचा शोध सुरू झाला. पोलिसांनी त्याच्याजवळ मोबाईल असल्याने मोबाईल ट्रॅक करून शोध घेतला. मार्कंडी टॉवर परिसरात त्त्याचे लोकेशन दाखवत होते. त्यामुळे पोलिसांनी शहरात त्याचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. अखेर शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान पोलिस महामार्गालगत कोसळलेल्या भिंतीच्या ठिकाणी गेले व चौकशी करू लागले.
कदाचित तो ढिगाऱ्याखाली गाडला गेला असावा, असा संशय आल्याने पोलिसांनी तत्काळ कामगार बोलावून ढिगारा उपसण्यास सुरुवात केली. माती व कोसळलेले चिरे उचलत असताना तेथे सिद्धांत दिसून आला. बाहेर काढताच तो मृत असल्याचे लक्षात आले. डोक्यावर चिरे पडल्याने डोके आणि चेहरा चिरडून गेला होता. तब्बल चोवीस तासांनंतर मृतदेह हाती लागल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेह विच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद कायात आली आहे.
आयटी क्षेत्रात करिअरचे स्वप्न भंगले – सिद्धांत प्रदीप घाणेकर हा विद्यार्थी डीबीजे महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. तो अत्यंत हुशार आणि कष्टाळू होता. सुरुवातीला प्रवेश घेतल्यानंतर तो काहीकाळ महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होता; मात्र त्यानंतर तो लोटे येथील त्याच्या मामाकडे राहू लागला. दररोज चिपळूण-लोटे असा प्रवास करून तो महाविद्यालयात जात होता. त्याचे आयटी क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न होते. मात्र, निकृष्ट कामाचा तो बळी ठरला.
टपरीजवळ थांबल्याचे मित्राला सांगितले होते – पाऊस आला म्हणून सिद्धांत टपरीच्या आडोशाला गेला. त्याचवेळी त्याचा मित्राला फोन करून पाऊस आला म्हणून टपरीजवळ थांबलो आहोत. थोड्या वेळात कॉलेजला येतो, असे सांगितले. त्यानंतर लगेचच ही दुर्घटना घडली आणि तो ढिगाऱ्याखाली गाडला गेला; परंतु आपला मित्र पावसामुळे कॉलेजला न येता घरी गेला असावा, असा अंदाज त्या मित्राने बांधला आणि नेहमीप्रमाणे तो कॉलेज करून घरी निघून गेला. दुर्दैवाने, ही टपरी कायमची बंदच असते. त्यामुळे ढिगाऱ्याखाली कोणी गाडले गेले असावे याचा अंदाज कोणालाच आला नाही. मित्राने जरी त्याच्याशी झालेल्या संभाषणाची माहिती कुणाला दिली असती, तर ही भिंत कोसळल्यानंतर लगेचच त्याला बाहेर काढणे शक्य झाले असते.
अतिक्रमणे हटविणार महामार्गालगतची – अतिक्रमणे, टपऱ्या, खोकी, शेड काढण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांना अवधी देऊनही अतिक्रमणे हटवलेली नाहीत. त्यामुळे आता पोलिस बंदोबस्तात महामार्गालगतची सर्व अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत, असे राष्ट्रीय महामार्ग चिपळूण विभागाचे उपअभियंता कुलकर्णी यांनी सांगितले.