जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात नागरिकांना आज दाखल्यासाठी ताटकळत राहावे लागले. सेतू, महाई-सेवा व नागरी सुविधा केंद्राचा सर्व्हर डाउन झाल्यामुळे ऑनलाईन सेवेचे आज सर्व कामकाज ठप्प झाले. याचा मोठा परिणाम कामकाजावर होऊन नागरिकांचा खोळंबा झाला. सायंकाळी उशिरापर्यंत सर्व्हरच्या तांत्रिक दोष कायम राहिल्याने नागरिकांना दाखले न घेताच घरी परतावे लागले. शैक्षणिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे, दाखले व नागरिकांना व्यक्तिगत कामासाठी लागणारे दाखले, कागदपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू, महा ई-सेवा व नागरी सुविधा केंद्रावर आजही प्रचंड गर्दी होती.
राज्य सरकारच्या महाआयटी विभागामार्फत सेतू, महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून शासकीय अनुज्ञप्ती, जात पडताळणी दाखले प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन देण्यात येतात. आज सकाळपासूनच महाऑनलाइनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या सर्व केंद्रावरील कामकाज तांत्रिक कारणास्तव ठप्प झाले. इतर कामकाजासाठी या केद्रांवर रांगा लावल्याचे दिसून आले. अनेक केंद्रांवर बिघाड असल्यामुळे बंद ठेवण्यात आली. ज्यांनी अगोदरच दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज केला आहे ते दाखलेही स्वाक्षरीविना प्रलंबित आहेत.
सर्व्हर डाउन असल्यामुळे अधिकाऱ्यांना लॉगइन करता येत नव्हते. त्यामुळे दाखलेच ओपन होत नसल्याने थंब देणार तरी कसा, असा सवाल अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. सध्या प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याने दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत तसेच शासनाच्या विविध भरती प्रक्रियांच्या आवश्यकतेमुळे पूर्वतयारी म्हणून दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज करत असल्याने अर्जाची संख्या वाढली आहे. अशातच राज्य शासनाच्या नव्या योजनांसाठी आवश्यक दाखल्यांसाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्यातच राज्यासाठी एकच क्लाऊड सर्व्हर आहे.
संपूर्ण राज्याचे दाखल्यांचे वितरण प्रक्रिया या एकाच सर्व्हरवरून केले जात असल्याने क्लाउडमध्ये जागेची कमतरता भासत आहे. त्यामुळे नवीन अर्ज स्वीकारण्यात अडचणी येत आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र क्लाउड सर्व्हर देण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रामध्ये सोमवारी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. सर्व्हर डाउनमुळे दाखले अपलोड होण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती.

 
                                    