25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKokanभरकटलेल्या महाकाय जहाजाला वाचविण्यासाठी समुद्रात थरार!

भरकटलेल्या महाकाय जहाजाला वाचविण्यासाठी समुद्रात थरार!

जेएसडब्लू कंपनीचे महाकाय जहाज अलिबागच्या समुद्रात भरकटले होते.

धो-धो पाऊस.. सोसाट्याचा वारा.. खवळलेला समुद्र अशा साडेसातीच्या फेऱ्यात अडकलेलं जेएसडब्ल्यू कंपनीचे हे धरमतरकडून जयगडच्या दिशेने कोळसा घेऊन निघालेलं बलाढ्य जहाज समुद्रात भरकटलं आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस असलेल्या समुद्रात ते अडकून पडले होते. जहाजात १४ खलाशी होते, ते रात्रभर खवळलेल्या समुद्राशी संघर्ष करत होते, अखेर सकाळपासून खलाशांना वाचविण्याचा थरार सुरू झाला, अन् हेलिकॉप्टरने सात फेऱ्या मारून त्यांची सुटका केली.

याबाबत पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी रायगडला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. समुद्रही गेले दोन दिवस खवळलेला होता. शिवाय मुसळधार पावसामुळे धुकेजन्य परिस्थिती आणि सोसाट्याचा वारा यामुळे रत्नंगिरीतील जयगड बंदराकडे निघालेले जेएसडब्लू कंपनीचे महाकाय जहाज अलिबागच्या समुद्रात भरकटले होते. हे जहाज कोळसा घेऊन जयगडच्या दिशेने निघाले होते. गुरुवारी खराब हवामान, सोसाट्याचा वारा आणि कमी दृष्यमानता याचा या जहाजाला फटका बसला, आणि हे जहाज भरकटले.

वादळी वाऱ्यामुळे अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस असलेल्या समुद्रात ते अडकून पडले होते. इंजिनमध्ये पाणी शिरल्याने खलाश्यांनी बार्ज याच ठिकाणी नांगरून ठेवले होते. रात्रभर समुद्राशी झुंज गुरुवारी रात्री बार्जमधील खलाश्यांच्या सुटकेसाठी स्थानिक यंत्रणांच्या मदतीने प्रयत्न सुरू करण्यात आले होते. मात्र अंधार आणि खराब हवामानामुळे खलाश्यांची सुटका होऊ शकली नव्हती. शेवटी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयांने मदत व बचावासाठी तटरक्षक दलाशी संपर्क केला. या साऱ्यात गुरूवारची रात्र निघून गेली. वादळ-वारा सहन करत खलाशांनी सारा रात्र समुद्रातच झुंजत काढली.

शुक्रवारी सकाळी पावासाने उघडीप दिल्यानंतर मुंबईतून सिजी ८१० हेलिकॉप्टर आकाशात झेपावले. या हेलिकॉप्टरने सात फेऱ्या जहाजाला मारल्या, आणि त्यातील खलाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर अवघ्या काही मिनटात ते जहाज अलिबागच्या कुलाबा किल्ल्याजवळ दाखल झाले. तटरक्षक दलाचे दोन जवान भरकटलेल्या जहाजावर उतरले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर सात टप्प्यात सर्व खलाश्यांची बोटीवरून सुटका केली. नंतर त्यांना आरोग्य तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular