28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

कशेडीतील एक भुयारी मार्ग आजपासून बंद…

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी दोन भुयारी...

महामार्ग चौपदरीकरणाचे ऑडिट करा – वाहनचालकांची मागणी

मागील १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम...

एकच वादा.. अजित दादा ! चिपळुणात उद्या राष्ट्रवादीचा आवाज घुमणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पक्षाची...
HomeChiplunचिपळूण पंचायत समितीची नवी इमारत सहा मजली - उपमुख्यमंत्री पवार

चिपळूण पंचायत समितीची नवी इमारत सहा मजली – उपमुख्यमंत्री पवार

याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे पाठवला आहे.

गेल्या काही वर्षांपासून चिपळूण पंचायत समितीच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव मार्गी लागलेला नाही. अखेर बहादूरशेखनाका येथील सभापती निवासस्थानच्या जागेत पंचायत समितीची नवीन इमारत बीओटी तत्त्वावर उभारण्याचे नियोजन आहे. सुमारे सहा कोटी खर्चाची सहामजली इमारत उभारण्यात येणार असून, पंचायत समितीचे सर्व विभाग एकाच छताखाली येणार आहेत. याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे पाठवला आहे. मंगळवारी आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली असता चिपळूण पंचायत समितीची नवीन इमारत तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.

येथील पंचायत समितीची इमारत जीर्ण झाली असून, पंचायत समितीचे काही विभाग इतरत्र भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या पंचायत समितीच्या ठिकाणीच नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव होता. गेल्या २० वर्षांच्या कालावधीत अनेक सभापती आणि लोकप्रतिनिधींनी पंचायत समितीच्या नव्या इमारतीची घोषणा केली. अनेकदा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला तरी त्याला यश आले नाही. निधीअभावी इमारतीची समस्या निर्माण झाली होती. बहादूरशेखनाका येथे जिल्हा परिषदेची जागा असून तेथे सभापती निवासस्थान आहे.

हे सभापती निवासस्थान मोडकळीस आले असून, तेथे अनेक वर्षांपासून वास्तव्य नाही. तेथील जागाही मोठी असून जाणे-येणे नागरिकांच्या सोयीचे होणार आहे. त्यामुळे याच जागेत पंचायत समितीची नवी इमारत उभारण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे. यासाठी आमदार शेखर निकम सातत्याने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करत आहेत. बहादूरशेखनाका येथील जागेत सहामजली इमारत उभारण्यात येणार आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या धर्तीवर ही इमारत उभारण्याचे नियोजन आहे. या नव्या इमारतीचा खर्च जवळपास ६ कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

एकाच छताखाली पंचायत समितीचे सर्व विभाग आणले जाणार आहेत. त्यामुळे नव्या इमारतीत पंचायत समितीबाहेर असलेल्या महिला बालकल्याण, आरोग्य आणि बचत गट विभागाला हक्काची जागा मिळणार आहे. सध्या अस्तित्वात असलेली पंचायत समितीची इमारत ९९ वर्षांच्या कराराने बांधकाम करणाऱ्या कंपनीला, बांधकाम व्यावसायिकाला देण्याचे नियोजन आहे. येथून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग जिल्हा परिषदेला देण्यात येणार आहे. बीओटी तत्त्वावर ही इमारत उभारण्यात येणार असल्याने त्यास लवकरच मान्यता मिळेल, अशी शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री सामंत यांच्याशी चर्चा करताना आमदार निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular