25.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeDapoliहर्णे बंदरातील मच्छीमारीसाठी नौका समुद्रात, मच्छीमारांची सज्जता

हर्णे बंदरातील मच्छीमारीसाठी नौका समुद्रात, मच्छीमारांची सज्जता

हर्णे बंदरात परवानाधारक ८०० ते ९०० लहान-मोठ्या मासेमारी नौका आहेत.

पावसाचा जोर ओसरल्यामुळे समुद्रावर स्वार होण्यासाठी मच्छीमार सज्ज झाले आहेत. हर्णे बंदरातील चार मच्छीमारी नौका सोमवारी (ता. ५) सायंकाळी मासेमारीसाठी रवाना झाल्या असून, उर्वरित नौका चार दिवसांत समुद्रात जाणार आहेत; मात्र रत्नागिरी, गुहागरसह राजापूर तालुक्यांतील मच्छीमार अजूनही वातावरण शांत होण्याची प्रतीक्षा करत आहेत. गेले आठवडाभर जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे १ ऑगस्टला शासनाची बंदी उठल्यानंतर मासेमारीला सुरुवात होऊनही खराब वातावरणामुळे मच्छीमारांना त्याचा काहीच फायदा झाला नाही.

१ जून ते ३१ जुलै या कालावधीत ६१ दिवसांचा मत्स्य प्रजोत्पादनाचा काळ असतो. शासनाकडून मासेमारीला दरवर्षीप्रमाणे परवानगी दिली जाते; परंतु पहिल्याच दिवशी बदलत्या हवामानाचा मासेमारीला फटका बसला. समुद्र खवळल्यामुळे नौका समुद्रात न पाठवता किनाऱ्यावरच उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात मिरकरवाडा आणि हर्णे ही दोन बंदरे सर्वांत मोठी आहेत. हर्णे बंदरात परवानाधारक ८०० ते ९०० लहान-मोठ्या मासेमारी नौका आहेत. वातावरण स्थिर नसल्यामुळे मच्छीमारांनी बंदरातच उभे राहणे पसंत केले.

रविवारी सायंकाळपासून वातावरण स्थिर होऊ लागले आहे. त्यामुळे मच्छिमारांना दिलासा मिळाला आहे. सोमवारपासून समुद्रात जाण्याची तयारी सुरू झाली आहे. बर्फ, पाणी यांसह अन्य साहित्य नौकांवर चढवण्याचे काम सुरू झाले आहे. बंदी उठवल्यानंतर पाच दिवसांनी आज चार नौका समुद्रात रवाना झाल्या आहेत. या नौका दापोलीपासून सुमारे १५ वावात दापोली ते श्रीवर्धनदरम्यान मासेमारी करणार आहेत. काही नौका उद्या समुद्रात जातील, असे मच्छीमारांनी सांगितले.

जिल्ह्यातील अन्य बंदरांतील नौका शुक्रवारपर्यंत बाहेर पडणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. दरम्यान, वातावरण खराब असले तरीही मुंबईच्या नौका १ पासूनच मासेमारीसाठी बाहेर पडल्या आहेत. त्यांना कोळंबी मिळत असून दरही चांगला आहे. त्यामुळे समुद्रात गेलेल्या नौकांना चालू कोळंबी बंपर सापडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular