मुंबई-गोवा महामार्गावर कामथे येथील पिकअप शेडजवळ कंटेनर आणि टेंपोच्या भीषण अपघातात सिंधुदुर्गमधील दोघे जागीच ठार झाले. चालक ऋत्विक संतोष शिरोडकर (वय २७ रा. वेंगुर्ले भटवाडी) आणि रामचंद्र ऊर्फ रामा राजेंद्र शेणई (३०, रा. वेंगुर्ले, परबवाडा, सिंधुदुर्ग) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात गुरुवारी (ता. ८) सकाळी ७ च्या सुमारास झाला. याबाबत माहिती अशी, चालक ऋत्विक शिरोडकर हा मित्राला घेऊन टेंपोने सिंधुदुर्गकडे जात होता. रात्री ते दोघे मुंबईतून गावाकडे जाण्यासाठी रवाना झाले.
कामथेजवळ रस्त्यालगत उभ्या असलेल्या २२ चाकी कंटेनरला (एमएच ४६ बीयू १४०६) मुंबईहून वेंगुर्लेकडे जाणाऱ्या टेंपो (एमएच ०७ एजे १७७१) मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की टेंपो चालक ऋत्विक संतोष शिरोडकर आणि रामचंद्र ऊर्फ रामा राजेंद्र शेणई (वेंगुर्ले, परबवाडा, सिंधुदुर्ग) हे दोघे जागीच ठार झाले. अपघात गुरुवारी (ता. ८) सकाळी ७ च्या सुमारास झाला. अपघात झाला तेव्हा महामार्गावर वाहनांची फार गर्दी नव्हती. चालक ऋत्विक शिरोडकर मित्रासह रात्री मुंबईतून गावाकडे जाण्यासाठी रवाना झाले. मात्र चिपळूणला सकाळी आल्यानंतर त्यांना मृत्यूने कवटाळले. चालक ऋत्विक शिरोडकर याला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
टेंपोने कंटेनरला धडक दिल्यानंतर आवाज झाला. हा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी धावणारी वाहने थांबली. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे चिपळूण तालुकाध्यक्ष समीर काझी, शुभम किलजे, अण्णा कुडाळकर, बंटी महाडिक, संतोष जावळे, सुदेश महाडिक, भाऊ लंकेश्री, दशरथ खेडेकर, सार्थक महाडिक, शैलेश माटे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
अपघात इतका भीषण होता की टेंपोच्या केबिनचा चक्काचूर झाला. त्यामुळे दोघेही टेंपोत चिरडले. टेंपोचे मोठे नुकसान झाले. टेंपोमध्ये अडकलेल्या दोघांना जेसीबीद्वारे बाहेर काढले. दोघांचे मृतदेह काढून कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. हवालदार पांडुरंग पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या अपघाताची चिपळूण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. शेणई हा ट्रान्सपोर्ट व्यवसाय करीत होता. त्याने काही महिन्यांपूर्वीच हा व्यवसाय सुरू केला होता. कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांचे मृतदेह वेंगुर्ले येथे पाठवण्यात आले. ऋत्विक शिरोडकर याच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक हिंगे करीत आहेत.