मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरांत उभारण्यात येणाऱ्या लक्षवेधी पिकअप् शेड राजापूर शहरात चार ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. या शेडमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या पुढाकारामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर या शेड उभारण्यात आल्या आहेत. राजापूर शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्यावर जकातनाका, राजापूर पोस्ट कार्यालय, ग्रामीण रुग्णालय व हायस्कूल अशा चार बसथांब्यावर सुसज्ज अशा पिकअप् शेड उभारण्यात आल्या आहेत.
शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २०२१ मध्ये या बसथांब्यावरील पिकअप् शेड उभारणीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याला शासनाकडून निधीही मंजूर झाला. त्या निधीतून या शेड उभारल्या गेल्या. या ठिकाणी एलईडी लाईटची सुविधा आहे. रात्री उशिरा प्रवासी या ठिकाणी न घाबरता एसटीची प्रतीक्षा करू शकतात. पूर्वी या परिसरात रात्री-अपरात्री प्रवाशांना उभे राहणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे. त्या शेडमध्ये फ्लेक्सची व्यवस्था आहे.
त्यावर व्यावसायिक व राजकीय कोणाच्याही जाहिराती प्रसिद्ध करता येणार आहेत. त्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडे अर्ज करून परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नातही, भर पडणार आहे. तसेच नव्या पद्धतीमध्ये बांधण्यात आलेल्या या शेड शहराच्या सौंदर्यात भर टाकत आहेत. दरम्यान, माजी नगराध्यक्ष अॅड. खलिफे यांच्या पिकअप् शेड उभारणीच्या लोकोपयोगी कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच प्रशासकीय स्तरावरील कार्यवाहीसाठी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी विशेष नियोजन केले होते.