औद्योगिक क्षेत्रामध्ये रत्नागिरीचे नाव देशभरात व्हावे यासाठी लवकरच संरक्षणाशी निगडीत १० हजार कोटीची गुंतवणूक असलेल्या उद्योगाशी करार होणार असून आठवडाभरात त्याची घोषणा होईल. त्यासाठी हजार एकर जमिनी शेतऱ्यांच्या परवानगीने संपादीत केली जाईल. तसेच वैद्यकीय क्षेत्रासाठी म्हणजे मेडिकल कॉलेजच्या नव्या इम ारतीसाठी चंपक मैदानावरील २० एकर जागा देण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली. एमआयडीसी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ना. सामंत म्हणाले, राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीत उद्योग विभागाबाबत अविश्वास पसरविण्याचे काम विरोधक करीत आहेत. महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प बाहेर गेले, असे बोलले जात आहे. परंतु असे काही नाही. दोन वर्षांमध्ये ५ लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. रायगडमध्ये दीघी बंदराचा विकास केला जाणार आहे. ५ हजार कोटी खर्च करून उद्योग शहर बनविण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे. त्याबद्दल कोकणाच्यावतीने मी केंद्राला धन्यवाद देतो. ३८ हजार कोटीची गुंतवणूक यामध्ये असून १ लाख १४ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.
प्रकल्प होईपर्यंत अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. केंद्र शासन राज्य शासनाला काही देत नाही, असा नॅरेटीव्ह पसरविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु केंद्राच्या या निर्णयामुळे हे सर्व आरोप पुसले गेले आहेत. पालघरमध्ये वाढवण बंदर देशातील सर्वांत मोठे बंदर म्हणून विकसीत केले जाणार आहे. महाराष्ट्राच्या गुंतवणुकीत यामुळे मोठी वाढ होणार आहे. या प्रकल्पासह दीघी बंदराच्याबाबत घेतला निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या बंदरालगत विमानतळ आहे, रेल्वे, समुद्रजवळ असल्यामुळे कोकणाची आर्थिक उन्नती होणार आहे.
रत्नागिरीत देखील १० हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाशी करार करण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे. त्यासाठी लागणारी एक हजार एकर जागा शेतकऱ्यांच्या परवानगीने संपादीत केली जाईल. तसेच मेडिकल कॉलेजच्या नव्या इमारतीसाठी चंपक मैदान येथील २० एकर जमीन एम आयडीसी प्रशानाने देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच २०० कोटीचे ट्रेनिंग सेंटर येथे उभारले जात आहे. यामुळे रत्नागिरीत गुणवंत विद्यार्थी तयार करण्याच्या प्रयत्नाला आम्हाला आता यश आले आहे, अशी माहिती ना. सामंत यांनी दिली.