रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा ‘शॉर्टकट’ मार्ग म्हणून ओळखला जातो; मात्र अणुस्कुरा घाटात गेल्या काही वर्षांमध्ये पावसाळ्यात दरडी आणि माती कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. यावर्षी दोनवेळा दरड कोसळली. त्यामुळे हा मार्ग प्रवासाच्यादृष्टीने धोकादायक ठरत आहे. धोकादायक दरडी, अरूंद अन् धोकादायक वळणे, भूस्खलन, संरक्षण कठड्यांची आवश्यकता आदींच्या अनुषंगाने घाटाचे सव्र्व्हेक्षण करण्याची गरज आहे. तसेच घाटरस्ता रुंदीकरणासह अन्य उपाययोजना करण्याची मागणी आमदार राजन साळवी यांनी केली आहे. तसा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचेही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचित केले आहे.
सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकणचे नूतन मुख्य अभियंता मिलिंद कुलकर्णी यांची आमदार साळवी यांनी भेट घेतली. यावेळी अणुस्कुरा घाटामध्ये करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चाही केली. नऊ किमीचा हा घाट घाटमाथा ते कोकण या प्रवासासाठी ‘शॉर्टकट’ असल्याने वाहनचालक अधिक पसंती देतात. त्यामुळे वर्षभर या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते; मात्र हा घाट दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. अनेक ठिकाणी उंच डोंगर, उभ्या रेषेतील दरडी, मोठमोठ्या दगडी कधीही खाली कोसळण्याच्या स्थितीत आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये अतिवृष्टीच्या काळामध्ये धोकादायक दरडी, मोठे दगड आणि माती पडून रस्ता काही काळापुरता बंद झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
यावर्षींही तीन महिन्यांमध्ये दोनवेळा घाटामध्ये दरड कोसळली. दरडी कोसळल्यानंतर बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात; मात्र, पुढीलवर्षी त्याची पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होते. सातत्याने होणाऱ्या या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासह घाटरस्ता कायमस्वरूपी निर्धोक होण्यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. धोकादायक दरडी, अरूंद अन् धोकादायक वळणे, संभाव्य भूस्खलन, संरक्षण कठड्यांची आवश्यकता आदींच्या अनुषंगाने हे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. याकडे आमदार साळवी यांनी सार्वजनिक बांधकामाचे लक्ष वेधले आहे. रस्ता रुंदीकरणासह अन्य उपाययोजना करण्याबाबतही त्यांनी सूचित केले आहे. त्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.