महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांना काल कार्यालयातच बेदम मारहाण झाली. पक्षांतर्गत वादातून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली. या मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री मनसेच्या कार्यालयात हा प्रकार घडला. फिर्यादी रुपेश जाधव हे गोडबोले स्टॉप येथील आपले इलेक्ट्रिकचे दुकान बंद करून ऑफिस समोर लावलेल्या चारचाकी गाडीचा दरवाजा उघडत होते. या दरम्यान अचानक पाठीमागून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. संशयित सूर्यकांत उर्फ रुपेश चव्हाण आणि राहुल खेडेकर या दोघांनी रुपेश जाधव यांच्यावर हल्ला चढवला.
राहुल खेडेकर याने रुपेश जाधव यांना धरून ठेवले तर सूर्यकांत चव्हाण याने रुपेश जाधव यांना दांडक्याने मारहाण केली. रुपेश जाधव यांच्या पायावर दांडक्याने चार-पाच फटके मारल्याने ते रस्त्यावर कोसळले. यानंतर चव्हाण याने जाधव यांच्या डोक्यात, हातावर, पाठीवर, पोटावर मारहाण केली. दुसरा संशयित राहुल खेडेकर याने लाथांनी जाधव यांना मारहाण केली. रुपेश जाधव यांना मारहाण करतानाचे शुटिंग करण्यात आले. रुपेश जाधव यांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सूर्यकांत उर्फ रुपेश चव्हाण (रा. करवांचीवाडी) आणि राहुल खेडेकर (रा. रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल आला आहे. पोलिस संशयितांच्या शोध आहेत.