25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiriगणेश भक्तांचा प्रवास सुरळीत करा - पालकमंत्री सामंत

गणेश भक्तांचा प्रवास सुरळीत करा – पालकमंत्री सामंत

रिक्षाभाडे नियमानुसार आकारण्याबाबत परिवहन विभागाने नियंत्रण ठेवावे.

गणेशोत्सव जिल्ह्यामध्ये शांततेत पार पडावा, गणेशोत्सवासाठी मुंबईहून येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत व सुखकर व्हावा, महामार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळावी, महामार्गावर गणेशभक्तांच्या मदतीसाठी मदतकेंद्रांची स्थापना करावी, सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी चोख पार पाडावी, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री सामंत आज दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत म्हणाले, गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत व सुखकर व्हावा यासाठी महामार्गावर मदतकेंद्रांची स्थापना करावी. या केंद्रांमध्ये प्राथमिक वैद्यकीय उपचार, पाणी, चहा आर्दीची व्यवस्था ठेवावी. महामार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी संबंधित विभागाने नियोजन करावे.

महामार्गावरील खड्डे तत्काळ बुजवण्यात यावेत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, कशेडी घाटापासून ते राजापूर तालुक्यापर्यंत सर्व रस्त्यांची दुरुस्तीची कामे येत्या दोन दिवसात पूर्ण करावीत. जिल्ह्यात महामार्गावर सुविधा केंद्र उभारण्याची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ करावी. या केंद्रांवर वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार सुविधा, पोलिस मदतकेंद्र, आपत्कालीन पोलिस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, मोफत चहा, बिस्कीट, पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित विभागांना केल्या. रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या महत्वाच्या रेल्वेस्थानकावर सुविधा केंद्र उभारण्यात यावेत.

भेसळ आढळल्यास कारवाई – सणाच्या कालावधीमध्ये मिठाईची विक्री मोठ्या प्रमाणात होते. या वेळी अन्न व औषध प्रशासन विभागाने भरारी पथकांची नेमणूक करून मिठाईमधील भेसळ तपासणी करावी. एखादा विक्रेता भेसळयुक्त अथवा मुदत संपलेल्या मिठाईची विक्री करताना आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जादा रिक्षाभाडे आकारणाऱ्यांवर लक्ष – रेल्वेस्थानकावरून एसटी स्थानकापर्यंत जाण्यासाठी अनेक प्रवासी रिक्षाने प्रवास करतात त्या वेळी रिक्षाभाडे नियमानुसार आकारण्याबाबत परिवहन विभागाने नियंत्रण ठेवावे. गर्दीचे नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन करावे. रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा कार्यरत ठेवून रेल्वेमार्गावर अडचण निर्माण झाल्यास पर्यायी यंत्रणा उपलब्ध ठेवावी असे सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular