सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या पावसाने भातशेतीला फटका बसला आहे. रत्नागिरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी दुपारच्या सुमारास भात कापले असून ते पावसात भिजून गेले. शेतकऱ्यांना भिजलेले भात सुकवण्यासाठी घरामध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटांसह वेगाने वादळी वारा आणि मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिला आहे. समुद्रकिनारी भागात ताशी ३०-४० किमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता. २४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सरासरी ३६.२९ मिलीमिटर पावसाची नोंद झाली.
त्यात मंडणगड ३२, दापोली २८.७१, खेड ४७.४२, गुहागर २१.६०, चिपळूण २३.६६, संगमेश्वर ७२.८३, रत्नागिरी ३५, लांजा ३७.८०, राजापूर २७.६२ मिमि पाऊस झाला. जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत ४०१६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दुपारनंतर सुरू झालेला पावसाचा जोर रात्रीपर्यंत कायम होता. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, खेड, चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात हलक्या सरी पडून गेल्या. रत्नागिरी तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रत्नागिरीतील सोमेश्वर, पोमेंडी पट्ट्यातील काही शेतकऱ्यांनी भात कापणीला प्रारंभ केला.
मात्र दुपारनंतर पडलेल्या पावसामुळे सुकवण्यासाठी ठेवलेले भात भिजून गेले. अखेर भिजलेले भात घरामध्ये आणून ठेवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. पावसामुळे तयार भात कापणीस सुरवात करण्याचा धाडस शेतकरी करत नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक भागात विजांच्या कडकडाटांसह ३०-४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारा आणि पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
भिजलेले भात घरात – रत्नागिरीतील सोमेश्वर, पोमेंडी पट्ट्यातील काही शेतकऱ्यांनी भातं कापणीला प्रारंभ केला. मात्र, दुपारनंतर पडलेल्या पावसामुळे सुकवण्यासाठी ठेवलेले भात भिजून गेले. अखेर भिजलेले भात घरामध्ये आणून ठेवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. पावसामुळे तयार भात कापणीस सुरुवात करण्याचा धाडस शेतकरी करत नाही.