रत्नागिरी शहरात गजबलल्या ठिकाणी दिवसा ढवळ्या एक महीला व एका पुरूषाने घरात घुसुन वृध्द महीलेला डांबुन ठेवले. त्यानंतर तिचे तोंड दाबुन तिच्या अंगावरील ४ ते ५ तोळ्याचे दागीने लांबविले. ही घटना राधाकृष्ण टॉकीज/लता टॉकीज परीसरात शुक्रवारी सकाळी ८.३० ते स. ९.१५ वा. दरम्यान घडली. या धक्कादायक प्रकाराने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातून चोरट्याची टोळ्या शहरात सक्रिय झाल्याची चर्चा सुरु आहे. काही दिवसापूर्वी शहरात खासगी कार्यालये फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २७) असाच जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.
घरात घुसले – रत्नागिरीत ऐन मध्यवस्तीत असलेल्या राधाकृष्ण टॉकीज परिसरात एक पुरुष आणि एक महिला सकाळी खोली भाड्याने मिळेल का विचारत वृद्ध महिलेच्या घरात घुसले. शहरातील राधाकृष्ण टॉकीज समोरील दत्त कॅफेच्या पाठीमागील बाजूला सुनंदा श्रीराम पटवर्धन (७०) या वृद्ध महिला एकट्याच राहतात. शुक्रवारी त्या बाजूला गेल्या होत्या. त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्या परत आल्या असता त्यांच्यापाठोपाठ त्यावेळी घरामध्ये एक जोडपं शिरलं. रेकी करून ते वृद्ध महिलेच्या सकाळी ९ वा.च्या सुमारास घर भाड्याने द्यायचे आहे का? असे विचारत घरात घुसले.
वृध्देला कोंडले – घरात घुसल्यानंतर महीला एकटी असल्याची संधी साधत त्यांनी दरवाजे लावले. त्यानंतर त्यांनी तिचे तोंड दाबून तिच्याकडे असलेले सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यांच्या हातातील दोन बांगड्या व गळ्यातील १ चेन बळजबरीने काढून घेतली. सुनंदा यांनी यावेळी मोठा प्रतिकार केला. यावेळी मोठी झटापट झाली. मात्र वृद्ध महिला सुनंदा यांचा त्या जोडप्यापुढे टिकाव लागला नाही. हातातील एक बांगडी त्यांना काढता आली नाही मात्र झटापटीत जेवढे मिळाले तेवढे सोनं काढून घेत चोरट्यांनी पोबारा केला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरीकांनी धाव घेतली. या प्रकाराने वृद्ध महिला घाबरली असुन तिची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या चोरीची माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक महेश तोरसकर आपल्या टीमसह दाखल झाले होते. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ज्या जागी चोरी झाली त्या आजूबाजूला सीसीटीव्ही असल्यामुळे फुटेज मिळवण्यासाठी त्यांनी प्रक्रीया सुरू केली. या चोरट्यांविरुद्ध जबरी चोरी व दुखापत करणे या गुन्ह्याखाली भादंवी कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास शहर पोलिस निरीक्षक महेश तोरसकर करीत आहेत. मात्र आरोपी सापडलेले नाहीत.