26.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunसेना विरुद्ध सेना लढतीत भाजप होणार हद्दपार ?

सेना विरुद्ध सेना लढतीत भाजप होणार हद्दपार ?

जिल्ह्यातील दोन पारंपरिक मतदार संघावर भाजपला पाणी सोडावे लागेल.

रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घटनांना वेग आला आहे. महायुतीच्या जागावाटपात जिल्ह्यातील पाचपैकी चार जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्या जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या चारही मतदारसंघात सेना विरुद्ध सेना अशी लढत होईल. जिल्ह्यातील दोन पारंपरिक मतदार संघावर भाजपला पाणी सोडावे लागेल. त्या बदल्यात राज्यात जिंकता येतील अशा दोन जागा भाजप पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहे. महायुतीमध्ये संभाव्य जागावाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांबरोबर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी थेट संवाद साधत आहेत.

२००९ मधील शिवसेना-भाजप युतीचे जागावाटप आणि शिवसेना राष्ट्रवादी फुटल्यानंतर विद्यमान आमदारांना संधी देणे या दोन निकषावर सध्या जागा वाटपाचे सूत्र ठरत आहेत. कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्यामुळे येथे भाजपच्या तिकिटावर जिंकून येण्याची क्षमता असताना येथून इच्छुक असलेले माजी खासदार नीलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची चर्चा रंगली आहे. सिंधुदुर्गातील भाजपचे विद्यमान आमदार असलेले नीतेश राणे यांची एकमेव जागा भाजप लढवणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा आणि गुहागरमध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेचे आमदार आहेत. रत्नागिरी आणि दापोलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार आहेत.

महायुतीमध्ये या चारही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडले जाण्याची शक्यता आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुहागर आणि राजापूरमध्ये शिवसेना नवीन उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. रत्नागिरी आणि गुहागर हे दोन भाजपचे पारंपरिक मतदारसंघ आहेत. २००४ पासून येथे भाजपचे उमेदवार उदय सामंत यांच्याविरोधात कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे; परंतु भाजपला एकदाही यश आले नाही. सामंत सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे भाजपला ही जागा शिंदे शिवसेनेसाठी सोडावी लागणार आहे.

भाजपने २००९ मध्ये विधानसभेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्यासाठी गुहागरची जागा शिवसेनेला सोडली आणि भाजप नेत्या पूनम महाजन यांच्यासाठी मुंबईतील एक जागा पदरात पाडून घेतली. तेव्हापासून २०१९ पर्यंत भाजपचे पारंपरिक उमेदवार येथून निवडणूक लढवत आहेत; परंतु त्यांना यश येत नाही. भाजपने २००९ मध्ये तिकीट नाकारल्यानंतर माजी आमदार विनय नातू यांनी बंडखोरी केली. त्याचा फायदा भास्कर जाधव यांना झाला. २०१४ मध्ये शिवसेना-भाजप उमेदवारांना पडलेल्या मतांची बेरीज केली तरी भास्कर जाधव यांना अधिकची मते मिळाली.

मागील पाच वर्षांत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी भाजपच्या केंद्र आणि राज्यातील नेतृत्वाने फिल्डिंग लावली आहे. भाजपने गुहागर विधानसभा मतदारसंघाचा वेगवेगळ्या एजन्सीमार्फत सव्र्व्हे केला तो महायुतीच्या विरोधात असल्याचे समजल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी नवीन उमेदवाराचा शोध घेण्याची सूचना केली होती. खेडच्या तळेगावातील उद्योजक विपुल कदम हे भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे मर्जीतील मानले जातात.

कदम यांनी दिल्लीत शाह यांची भेट घेऊन उमेदवारी निश्चित झाल्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम आणि सेनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन काम सुरू केले. सेनेतील इच्छुकांनाही त्यांनी शांत केले आहे. मात्र, रत्नागिरी आणि गुहागरमधील भाजपचे मतदार सेनेच्या उमेदवारांना मतदान करणार की नाही, हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल. त्यावरच युतीच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular