26.4 C
Ratnagiri
Thursday, December 26, 2024
HomeRajapurछोट्या-मोठ्या उद्योगांमधून दहा कोटींची उलाढाल - उमेद महिला

छोट्या-मोठ्या उद्योगांमधून दहा कोटींची उलाढाल – उमेद महिला

२२ हजार १२० महिला संघटित होताना हजारो कुटुंबे एकमेकांशी जोडली गेली आहेत.

महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानांतर्गत (उमेद) राजापूर तालुक्यात १ हजार ६७१ बचतगटांची स्थापना झाली आहे. त्यातून, २२ हजार महिला संघटित झाल्या असून, त्यांनी छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामधून वर्षभरामध्ये सुमारे दहा कोटी रुपयांची उलाढाल होते. या उद्योगांमुळे महिलांच्या उदरनिर्वाहाचे साधन तयार झाले आहे. या अभियानाद्वारे महिला संघटित झाल्या असून त्यांना स्वयंरोजगाराचे धडे मिळत आहेत. स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात झाले. १ एप्रिल २०१८ पासून राज्यात कार्यान्वित झालेल्या उमेद अभियानात महिलांना संघटित करून सहकाराच्या धर्तीवर बचतगट गठित केले जात आहेत.

गरीब आणि जोखीमप्रवण कुटुंबांना समृद्ध, आत्मसन्मानाचे आणि सुरक्षित जीवन जगता यावे या दृष्टीने प्रयत्न करण्याचा उद्देश उमेद अभियानात ठेवण्यात आला आहे. या अभियानांतर्गत तालुक्यामध्ये १ हजार ६७१ बचतगटांची स्थापना झाली. त्यातून, २२ हजार १२० महिला संघटित होताना हजारो कुटुंबे एकमेकांशी जोडली गेली आहेत. सहकाराच्या धर्तीवर बचतगटाच्या माध्यमातून गठित झालेल्या या महिलांनी हळद लागवड, चारसुत्री पद्धतीने सामुदायिक भातशेती करणे यासह दिवाळीचा फराळ तयार करणे, कुक्कुटपालन, भाजीपाला तयार करून विक्री यांसह घरगुती उत्पादने तयार करणे आदी व्यवसाय करत आहेत.

गणेशोत्सवात अनेक बचतगटांच्या महिलांनी गणेशभक्तांकडून मागणी असलेले मोदकही तयार करून विक्री केले होते. कोरोना महामारीत बचतगटाच्या महिलांनी मास्क तयार करून त्याची विक्री केली होती. त्यामधून लाखो रुपयांची उलाढाल केली. त्यासाठी त्यांना तालुका उमेद विभागाचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभत आहे तर विविध बँकांनीही आर्थिकदृष्ट्या हातभार लावला आहे. या व्यवसायांमधून वर्षाला सुमारे दहा कोटी रुपयांची उलाढाल होते. गटातील महिला एकमेकांच्या साथीने आपल्या कुटुंबांचा आर्थिक डोलारा सांभाळत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular