पहिल्या डावात केलेल्या चुकांची भरपाई करण्यासाठी भारतीय फलंदाज धडपडत आहेत, तरीही सामना गाववण्यासाठी अजून बरीन मोठी मजल मारावी लागणार आहे. तब्बल ३५६ धावांच्या पिछाडीनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या या पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर सीन बाद २३९ धावा केल्या असल्या तरी अजून १२५ धावांची पिछाडी आहे. राचिन रवींद्रच्या शतकामुळे न्यूझीलंडने पहिल्या डावात ४०२ धावा केल्या त्यानंतर रोहित शर्मा यशस्वी जयस्वालची ७२ धावांची सलामी. विराट कोहली सर्फराझ खान यांची १३६ धावांची भागीदारी भारताला दिलासा देणारी ठरणार असे वाटत असताना दिवसाचा खेळ संपायच्या क्षणी विराट कोहली ७० धावांवर बाद झाला. सर्फराझ खान ७० धावांवर नाबाद राहिला आहे.
पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ चालू झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी मेहनतीने चार फलंदाज बाद करून न्यूझीलंडला सात बाद २३३ धावांवर रोखले होते. सामन्यात पुनरागमन करायची निर्माण झालेली पुसटशी संधी राचिन रवींद्र (१३४ धावा) आणि टीम साऊदी (६५ धावा) यांच्यादरम्यान झालेल्या १३७ धावांच्या भागीदारीने अंधुक झाली. न्यूझीलंडला ३५६ धावांची भरघोस आघाडी घेता आली ज्याने भारतीय संघाच्या अडचणी शतपटीने वाढल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरताना पहिले उद्दिष्ट डावाचा पराभव टाळणे होते. दडपणाखाली खेळताना भारतीय फलंदाजांनी कमालीचा सकारात्मक दृष्टिकोन दाखवला.
न्यूझीलंडचा पहिला डाव लवकर संपवायच्या स्पष्ट उद्देशाने भारतीय गोलंदाज मैदानात उतरले. डेरील मिचेलची महत्त्वाची विकेट खेळाच्या सुरुवातीला मिळाली. त्यानंतर ब्लंडल आणि फिलीप्स सह मॅट हेन्रीला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. समोर राचिन रवींद्र आरामात फलंदाजी करून धावा जमा करत राहिला. एकेरी दुहेरी धावांसोबत राचिन मोठे फटकेही सहजी मारत होता. टीम साऊदीने राचिनला चांगली साथ दिली आणि चित्रं पालटू लागले. दोघाही फलंदाजांनी धावफलक हलता नव्हे तर पळता ठेवला. खास करून भारतीय फिरकी गोलंदाजांना राचिन रवींद्र आणि टीम साऊदीने विश्वासाने तोंड दिले. रोहित शमनि हाती असलेले सर्व पर्याय वापरून बघितले ज्याला दोघा जम बसलेल्या फलंदाजांनी दाद लागून दिली नाही.
एकदा फक्त राचिन पायचित असल्याचे अपील अगदी थोडक्यात नाकारले गेले. तो अपवाद वगळता त्याने संधीच दिली नाही. उपहाराअगोदर राचिन रवींद्रचे बहारदार शतक पूर्ण झाले. जेवणानंतर भारतीय संघाने लगेच दुसरा नवा चेंडू घेतला. एव्हाना न्यूझीलंडची आघाडी ३००चा टप्पा कधीच पार करून गेली होती. टीम साऊदीने नुसतीच राचिन रवींद्रला साथ दिली नाही तर अष्टपैलू खेळाडूला शोभेल अशी कडक फलंदाजी करून ६५ धावा केल्या. भल्या मोठ्या भागीदारीनंतर साऊदी बाद झाला. राचिनने नंतर मनमोकळी फटकेबाजी केली. त्याने मारलेले षटकार चिन्नास्वामी मैदानाच्या दुसऱ्या मजल्यावर प्रेक्षकात जाऊन पडले.
जडेजा तीन बळी, कुलदीप यादव तीन बळी यांच्या प्रयत्नाने अखेर ४०२ धावांवर न्यूझीलंडचा डाव संपला, जेव्हा राचिन रवींद्र १३४ धावांवर बाद झाला. न्यूझीलंडच्या हाती ३५६ धावांची दणकट आघाडी लागली. किवी फलंदाजांनी चिन्नास्वामीची खेळपट्टी फलंदाजी करायला अजून ठीक असल्याचे दाखवून दिले होते. तोच धडा घेत दुसऱ्या डावात भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी निदान चहापानापर्यंत ५७ धावा जोडत बरी सुरुवात केली. एका तासापेक्षा जास्त काळ दोघा सलामीवीरांनी चांगला खेळ केला होता. ७२ धावा फलकावर जमा झाल्या असताना यशस्वी जयस्वालला खराब फटका मारायची हौस आली. एजाज पटेलचा चेंडू हातातून सुटायच्या आत जयस्वाल पुढे सरसावला आणि ३५ धावांवर स्टंप झाला.
रोहित शमनि मॅट हेन्रीच्या एकाच षटकात दोन चौकार आणि एक लांबच्या लांब षटकार मारून अर्धशतक पूर्ण केले. पुढच्याच षटकात रोहितने एजाज पटेलचा तटवलेला चेंडू नंतर घरंगळत स्टंपवर जाऊन आदळला. बेल्स खाली पडल्या आणि निराश चेहऱ्याने रोहित शर्माला तंबूत परतावे लागले. दोन बाद ९५ धावसंख्येवर विराट कोहली-सर्फराझ खानची जोडी मैदानात एकत्र आली. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या दोघांनी दडपण मागे सारून सकारात्मक खेळ करायचा विचार पक्का केलेला दिसला. एजाज पटेलला धारेवर धरत दोघांनी मोठे फटके लगावले. सर्फराझने फक्त ४२ चेंडूत अर्धशतक करताना तीन षटकार पाच चौकार मारले.