23 C
Ratnagiri
Friday, December 27, 2024
HomeChiplunचिपळुणातील सामान्यांचा एसटी प्रवास खडतर

चिपळुणातील सामान्यांचा एसटी प्रवास खडतर

प्रवाशांकडून जादा बसची गरज असतानाही एसटी बस उपलब्ध होत नाहीत.

प्रवासी संख्या वाढल्याने एसटीला अच्छे दिन येऊ लागले आहेत. मात्र, एसटी महामंडळाकडून पाहिजे त्या प्रमाणात एसटी बस उपलब्ध होत नाहीत. आगारात एसटी बसेसची संख्या वाढावी म्हणून कोणी प्रयत्न केले नाही. त्यामुळे एसटीला प्रवासी असूनही सेवा देताना अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. सध्या चिपळूण आगारात फक्त १२० एसटी बस उपलब्ध आहेत. त्याद्वारे लांब पल्ल्याच्या, मध्यम पल्ल्याच्या आणि ग्रामीण भागातील ५०० हून फेऱ्यांचे धनुष्य एसटीला पेलावे लागत आहे. एसटी बसच उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. दसपटी, पंधरागाव, पूर्व विभाग, खाडीपट्टा या भागात सांयकाळी जाणारे प्रवासी तासनतास एसटीची वाट पाहत उभे असतात. मात्र एसटी येईल की नाही याचा भरवसा नसतो. एसटीचे प्रवासी हजारात आणि बसची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी अशीच स्थिती येथील आगाराची झाली आहे. एसटी महामंडळांची बससेवा ही अजूनही ग्रामीण भागातील दळणवळणाचे महत्त्वाचे साधन आहे.

तालुक्यात आजही अनेक गावात एसटी वस्तीला जाते. एसटी महामंडळाने महिलांना ५० टक्के तिकिटात सवलत, विद्यार्थी सोबत यासह अन्य सवलती दिले आहेत. त्यामुळे काळानुसार एसटीने आधुनिकता स्वीकारताना एसटी बसची संख्याही वाढवण्याची गरज होती. मात्र, अगोदरच असलेला तोटा आणि शासनाकडून विविध सवलत योजनांची कोट्यवधी रुपयांची असलेली येणे बाकी यामुळे एसटीला नवीन बस घेता आल्या आहेत. परिणामी आजही अनेक बसची गरज असताना गेल्या दहा-पंधरा वर्षांपूर्वी ज्या बस घेतल्या आहेत, त्यावर प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांकडून जादा बसची गरज असतानाही एसटी बस उपलब्ध होत नाहीत.

जुन्या बसमुळे अडचण – आगाराकडे उपलब्ध असलेल्या अनेक एसटी या दहा-पंधरा वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यामुळे त्या कधी बंद पडतील, हे सांगता येत नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. बसेस रस्त्यातच बंद पडत असल्याने मोठ्या उत्साहाने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या उत्साहावर विरजण पडत आहे.

एसटीला कोणी वालीच नाही – चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा व्हायची. त्यामध्ये एसटीच्या कामाचा आढावा घेतला जायचा. अधिकारी आपल्या गैरसोयी सांगायचे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या गैरसोयी दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायचे. मागील तीन वर्षापासून पंचायत समितीमध्ये प्रशासक राज आहे. त्यामध्ये एसटीच्या समस्या ऐकण्यासाठी कोणी वालीच नसल्याचे चित्र चिपळूणमध्ये आहे.

RELATED ARTICLES

Most Popular