तालुक्यातील नाखरे-कालकरकोंड भागात चिरेखाणीवर बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी जेरबंद केले. या घुसखोरांवर दहशतवादविरोधी पथकाने कारवाई केली. अन्य ठिकाणी अशा प्रकारे घुसखोरी झाली आहे. यासाठी पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने चिरेखाणी, मच्छीमार व्यावसायिक आदी ठिकाणी जोरदार शोधमोहीम राबवून कामगारांची चौकशी केली. मात्र, ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. संशयितांना भाषा येत नसल्यामुळे पोलिसांकडून दुभाषी घेऊन तपास होणार आहे. नाखरे-कालकरकोंड भागातील आसिफ सावकार (रा. पावस बाजारपेठ) यांच्या चिरेखाणीवर १३ बांगलादेशीयांना पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने जेरबंद केले. बांगलादेशी जून २०२४ पासून वैध कागदपत्र नसताना राहत होते. त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मागनि भारतात अवैधरीत्या प्रवेश केला. पोलिसांनी चौकशी केली असता अनेक महत्त्वाची माहिती पुढे आली.
१३ बांगलादेशीयांनी भारताची सीमा ओलांडताना कोणतेही वैध कागदपत्र नव्हते. पश्चिम बंगालमधून ते रेल्वेने भारतात आले. तेथून एका एजंटद्वारे रोजगारासाठी ते रत्नागिरीत आल्याचे समजते. या घुसखोरीबाबत शासनाच्या गृहविभागाला माहिती दिली जाणार आहे. तालुका परिसरात अन्य ठिकाणी अशा प्रकारे बांगलादेशीयांनी घुसखोरी केली आहे का, याची शहनिशा करण्यासाठी पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील चिरेखाणी, मच्छीमार व्यावसायिक यांच्याकडे असलेल्या कामगारांची चौकशी केली. सायंकाळी उशिरापर्यंत हे ऑपरेशन सुरू होते. मात्र, उशिरापर्यंत कोणीही घुसखोर आढळून आले नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर पोलिसांनी १३ बांगलादेशींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
दुभाषाच्या शोधात पोलिस… – १३ बांगलादेशींना अटक केल्यानंतर पोलिसांना तपासात अनेक अडचणी समोर येत आहेत. ज्यांच्या अखत्यारीत हे बांगलादेशी राहात होते तो चिरेमालक मुंबईत उपचार घेत आहे. तसेच संशयितांना मराठी अथवा हिंदी येत नसल्याने त्यांच्याकडून तपासात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांकडून दुभाषीचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.