शहरात तसेच नजीकच्या परिसरात लोकशाही महोत्सवात मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. शिरगाव, परटवणे, मिरकरवाडा, घुडेवठार, राजिवडा येथे सकाळच्या सत्रात अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. विविध राजकीय पक्षांच्या बूथवर न जाता नागरिकांनी थेट स्लिप घेऊन मतदान केंद्राचा आधार घेतला. मिरकरवाडा येथील बंदरावर शुकशुकाट होता. शिरगाव, परटवणे, मिरकरवाडा, घुडेवठार येथे सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात मतदान झाले. ठिकठिकाणी मतदान केंद्राच्या रस्त्यावर विविध राजकीय पक्षांचे बूथ तयार करण्यात आले होते. घुडेवठार येथे चक्क महिलांनी बूथचा ताबा घेतला होता. अनेक महिलांनी या बूथवर सकाळपासून हजेरी लावली होती. चांगल्या प्रकारे वृद्धांना माहिती देऊन मतदान होत असल्याचे निदर्शनास आले तर शिरगाव परिसरात पक्षांच्या बूथवर कोणतीही गर्दी नव्हती.
शिरगाव-शिवरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात गर्दी होती, तर मिरकरवाडा येथील मतदान केंद्रावर मुस्लिम बंधू-भगिनींनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती. मिरकरवाडा, राजिवडा या मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त कडक होता. या कोणत्याही मतदान केंद्रावर दुपारपर्यंत कोणताही अनुचित प्रकार समोर आलेला नाही. नागरिकांनी दैनंदिन कामाचा उरक करण्यासाठी सकाळीच मतदानाला रांगा लावल्या होता. अकरा ते बारा या वेळेत मतदान कमी प्रमाण दिसले. मिरकरवाडा जेटी परिसरात परप्रांतीय खलाशी निवांत होते. शाळांना सुटी असल्यामुळे मिरकरवाडा जेटी येथे शुकशुकाट पाहायला मिळाला.