दापोली विधानसभा मतदारसंघात ६० टक्के मतदान झाले असून, नऊ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले आहे. २३ तारखेला या बंदिस्त मशीनमधून कोणाचं नशीब आजमावणार, याकडे येथील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम, मनसेचे उमेदवार संतोष अबगुल, बसपाचे उमेदवार प्रवीण मर्चेंडे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. या निवडणुकीमध्ये तीन योगेश कदम व तीन संजय कदम अशी नामसाधर्म्य असणाऱ्या सहा व्यक्ती होत्या. यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. आजच्या निवडणुकीमध्ये २ लाख ९१ हजार २९७ मतदार होते. यापैकी ६० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहेत. याकरिता १७२४ कर्मचाऱ्यांची व ४७० ईव्हीएम मशीनची नियुक्ती केलेली होती. याकरिता ५७ एसटीच्या गाड्या व तीन मिनीबसची देखील व्यवस्था करण्यात आली होती. हे कर्मचारी मंगळवारी सकाळी आपापल्या केंद्रांवर रवाना झाले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली.
निवडणुकीत केवळ नऊ उमेदवार असल्याने प्रत्येक मतदान केंद्रात केवळ एक मशीन होते. मतमोजणी २३ नोव्हेंबरला बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये होणार आहे. या निवडणुकीकरिता दापोली विधानसभा निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. सुमित जरंगण यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. या निवडणुकीसाठी गृहरक्षक दलाचे १४७ जवान, वनविभागाचे १० कर्मचारी, सहा. पोलिस अधिकारी, ५० पोलिस कर्मचारी व सीमा सुरक्षादलाचे ९० कर्मचारी तैनात होते, अशी माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली. ही निवडणूक विद्यमान आमदार योगेश कदम व माजी आमदार संजय कदम यांनी प्रतिष्ठेची केली आहे.
शिवसेना पक्षाच्या विभाजनानंतर पहिल्यांदाच दापोली विधानसभा मतदार संघ निवडणुकीला सामोरे जात आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दुपारनंतर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्यांचे मतदान झालेले नाही त्यांना मतदान केंद्रात आणण्याचे काम केले. यामुळे संध्याकाळनंतर मतदान केंद्रांवर पुन्हा गर्दी पाहायला मिळाली. हर्णै बंदरामध्ये सुमारे मतदानाकरिता सर्वच नौका हजर झाल्या होत्या. हर्णे बंदर आणि आंजर्ले खाडीत शाकारण्यात आल्या होत्या.
चाकरमान्यांची सोय – मुंबईतील चाकरमान्यांसाठी गाड्यांची सोय दापोलीतील सुमारे ३५ हजार मतदार मुंबई येथे आहेत. त्यांना दापोलीत मतदानाला आणण्याकरिता राजकीय पक्षांच्यावतीने गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती; मात्र यातील बहुतांश गाड्या आयत्यावेळी न आल्याने मतदार मतदानासाठी हजर राहू शकले नाही. त्यामुळे उमेदवारांची चिंता वाढली आहे.
केंद्रावरील कर्मचारी अस्वस्थ – हर्णे व विसापूर येथील मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला. येथे तत्काळ दुसरे मतदान यंत्र तेथे उपलब्ध करून देण्यात आले. इळणे मतदान केंद्रावर नेमणूक असलेल्या एका कर्मचाऱ्याला काल रात्री कर्तव्यावरच असताना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना तेथून तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.