मैत्रिणीसोबत भाट्ये समुद्रात खेळण्याचा आनंद लुटताना पॉलिटेक्नीकच्या २ विद्याध्यांच्या चांगलाच अंगलट आला. भाट्ये समुद्रात कोहीनूर पॉईंटच्या खालच्या बाजूला ते गेले होते. मात्र परतीच्यावेळी अचानक भरती आली आणि दोघेही अडकून पडले. अजस्त्र लाटा उसळू लागल्या आणि तरुण आणि तरुणी दोघेही जीवाचा आकांडतांडव करू लागले. अखेरीस दोन मच्छिमार तरुणांनी दाखवलेल्या धाडसामुळे या दोघांनाही सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आले. सध्या रत्नागिरीतील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत. मोठ्याप्रमाणात पर्यटक येऊ लागले आहेत. इयरएंड जवळ आल्याने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आतापासूनच अनेक पर्यटक रत्नागिरीत दाखल झाले आहेत. तर काहीठिकाणी विविध महाविद्यालयातील तरुणमंडळी पिकनिकसाठी समुद्रकिनारी येत असल्याचे पहायला मिळत आहे. रत्नागिरीतील पॉलिटेक्नीक येथे शिकणाऱ्या तरुणांनादेखील रत्नागिरीच्या समुद्राचा मोह आवरता आला नाही.
मित्रासोबत गेली – मिळालेल्या माहितीनुसार पॉलिटेक्नीकमध्ये शिकणारा एक तरुण आणि तरुणी हे दोघेही मंगळवारी भाट्ये समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. या परिसराची जराही ओळख नसताना ते दोघेही कोहिनूर हॉटेलच्यां मागच्या बाजूला घळीसारख्या भागात जाऊन पोहोचले.
ते निर्जनस्थळ – एकांतात दोघांनाही समुद्राच्या पाण्याशी खेळायचे होते. अंगाला झोंबणारा गार वारा आणि लाटांचे उडणारे फवारे अंगावर झेलीत ती दोघं मौजमस्ती करीत होते. भरती कधी येणार याची जराही कल्पना त्या दोघांना नव्हती आणि दोघेही पाण्याच्या भरतीत अडकले.
भरतीचे पाणी चढले – ज्या घळीमध्ये हे दोघे मौजमस्ती करत होते त्याठिकाणी अचानक भरतीचे पाणी चढू लागले. पाणी का वाढले? याची त्यांना जराही कल्पना नव्हती. अचानक लाटा उसळू लागल्या. परतीचा मार्ग बंद झाल्यानंतर दोघांचीही बोबडी वळाली. आता करायचे काय? असा प्रश्न असतानाच धडकी भरवणौऱ्या लाटांनी उसळी घ्यायला सुरुवात केली.
आकांडतांडव – आपण पाण्यात अडकलोय आता पाण्यात ओढले जाणार याची त्यांना कल्पना आली व त्यांनी जीवाचा आकांडतांडव करायला सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी आपल्या मित्रांशी संपर्क केला आणि लागलीच पोलिसांना कल्पना देण्यात आली. १ तरुण व १ तरुणी समुद्राच्या पाण्यात अडकले याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले.
२ तरुणांचे धाडस – याचवेळी २ तरुण त्याठिकाणी मासेमारी करत होते. त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. मात्र अडकलेल्या त्या दोघांकडे जाणे धोकादायक होते. अशावेळी जीवाची पर्वा न करता बुरहान मजगावकर आणि सुभानं बुडये हे दोघे मदतीला धावले आणि अडकलेल्या त्या दोघांना त्यांनी सुखरुप बाहेर आणले.
पॉलिटेक्नीकचे विद्यार्थी – मिळालेल्या माहितीनुसार तो तरुण व तरुणी दोघेही पॉलिटेक्नीकचे विद्यार्थी असून तरुण अमरावतीचा तर ती तरुणी जळगावची मूळची राहणारी असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी या दोघांनाही पोलीस स्थानकात आणले व दोघांची चौकशी केली यावेळी ही माहिती पुढे आली.
त्या मच्छिमारांचे पाय धरले – मृत्यूच्या दाढेतून त्या तरुणासह तरुणीला वाचवल्यानंतर दोघांनीही बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये या मच्छिमारांचे पाय धरले. पुन्हा अशी चूक आमच्याकडून होणार नाही, अशी कबुली देखील त्या दोघांनी दिल्याचे समजते.