शहराच्या विकासाची वाटचाल ऐतिहासिक राहिली आहे. अत्यंत खडतर अडचणीतून मार्ग काढत येथील विकास साधला गेला. त्यामुळेच येथील शहरीकरण, नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. ही नटवर्य काशिनाथ घाणेकरांची भूमी आहे. त्यांच्यासारखे कलाकार या भूमीतून घडावेत, नवकलाकारांना एक व्यासपीठ मिळावे यासाठी चिपळूण शहरात काशिनाथ घाणेकरांचे स्मारक व्हावे तसेच. बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्मारक व्हावे यासाठी नगरपालिकेने प्रयत्न करावेत अशा शब्दात माजी आमदार रमेश कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करत न.प. वर्धापन दिनाला शुभेच्छा दिले. चिपळूण नगरपरिषदेचा १४८ वा स्थापना दिवस सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांचे मनोगत या कार्यक्रमात चिपळूणचे माजी नगराध्यक्ष तथा चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना पुढील काळातील विकासाकडे देखील दृष्टिक्षेप टाकला.
यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले, माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, रिहाना बीजले, सावित्री होमकळस, लियाकत शहा व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी रमेश कदम म्हणाले १४८ वा स्थापना दिन साजरा करताना आपण त्यावेळचे चिपळूण आणि आताचे चिपळूण याची तुलना केली तर त्याकाळी किती अडीअडचणीतुन मार्ग काढत विकासाची वाटचाल त्या लोकांनी केली असेल याची कल्पना येईल. एकेकाळी चिपळूणमध्ये पिण्याच्या पाण्याची वानवा होती. कामथे धरणातून चिपळूण शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना प्रथम राबवण्यात आली होती. ते ही अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. आज ही कामथे येथे नगरपालिका म ालकीची १२ गुंठे जमीन आहे. अशाचं प्रकारे अनेक ठिकाणी नगरपालिकेच्या जमिनी आहेत. त्याशोधून काढा आणि ताब्यात घ्या, अन्यथा त्या जमिनी अन्य कोणीतरी बळकावेळ, हा धोका लक्षात घ्या. आशा सूचना देखील रमेश कदम यांनी यावेळी केले.
नटवर्य काशिनाथ घाणेकर यांच्यामुळे चिपळूण शहराचे नाव सातासमुद्रापार पोहचले. त्यामुळे त्यांचे एक मोठे स्मारक येथे उभे राहणे आवश्यक आहे. त्यासाठी चिपळूण नगरपालिकेचे जुने रेस्टहाऊंस ची जागा घ्या. त्याठिकाणी कलादालन, प्रशिक्षण, मार्गदर्शन असे नियोजन करा, येथून नवकलाकार घडले पाहिजेत. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकदेखील चिपळूण शहरात झाले पाहिजे. फक्त एखाद्या इमारतीला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देऊन त्यांची महती स्पष्ट होऊ शकत नाही. तर त्यांचे महाराष्ट्रासाठीचे योगदान पुढील पिढीसमोर ठेवायचे असेल तर एक भव्यदिव्य स्मारक येथे झाले पाहिजे असेही रमेश कदम म्हणाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम, लियाकत शहा, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत स्थापना दिनाला शुभेच्छा दिल्या.