खेड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच गुन्हेगारांच्या हालचालींवर करडी नजर ठेवता यावी म्हणून पोलिस यंत्रणेने लोकसहभागातून उभारलेल्या नेत्रा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला देखभाल दुरुस्तीअभावी घरघर लागली आहे. शहरात विविध ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे बंद स्थितीत आहेत. महामार्गावरील प्रमुख शहर आणि जवळच लोटेसारखी मोठी औद्योगिक वसाहत असतानाही सुरक्षेच्या उपाययोजनांकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्ह्यातील एक संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या खेडमध्ये प्रगतीआड गुन्हेगार व असामाजिक तत्त्व येऊ नये, या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञान वापरून मिशन नेत्रा प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला होता. खेड शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्यामुळे खेड शहर ‘नेत्रा’च्या कक्षेत आले होते.
त्यामुळे चोऱ्या, गुन्हे या घटनांना पायबंद बसणार आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी या नेत्रा मिशनसाठी सामाजिक सलोख्याने हात पुढे करत शासनाच्या या योजनेला पाठबळ दिले. दुबई येथील उद्योजक बशीर हजवानी यांनी हजवानी फाउंडेशनच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. खेडमधील स्थानिक एका ठेकेदाराला ही यंत्रणा उभारण्याची व देखभालीची जबाबदारी देण्यात आली होती; परंतु अल्पावधीतच ही यंत्रणा डबघाईस आली आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत लाखो रुपये खर्च करूनही खेड शहर परिसरातील अनेक कॅमेरे बंद आहेत. बसस्थानक, निवाचा चौक, गांधी चौक, तीनबत्ती नाका या ठिकाणी बसवलेली लाऊडस्पीकर यंत्रणाही धूळखात आहे.
लाऊड स्पीकर यंत्रणेची दुरवस्था – आरंभी या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अनेक महिने चांगले काम सुरू होते. एकाच ठिकाणी एक पोलिस कर्मचारी बसून वाहतूकही सुरळीत करण्यात पोलिस यंत्रणेला यश येत होते; पण काही महिन्यांतच खेड येथे नेत्रा मिशनअंतर्गत बसवलेले कॅमेरे आणि लाऊड स्पीकर यंत्रणा देखभाल नसल्यामुळे धूळ खात पडली आहे. याकडे स्थानिक पोलिस यंत्रणेने लक्ष देऊन तत्काळ ही यंत्रणा सुस्थितीत करावी, अशी आग्रही मागणी खेड शहरवासीयांनी केली आहे.
यासाठी राबवला होता प्रकल्प – जिल्ह्यातील शहराच्या विस्तारामुळे वाहतूक वाढत असतानाच पोलिसांचे संख्याबळ कमी आणि दुसरीकडे वाढती गुन्हेगारी हे लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील प्रमुख शहरांत मिशन नेत्रांतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून गुन्हेगारीला आळा घालणे, संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवणे, वाहतूक नियंत्रण व जनजीवन असामाजिक तत्त्वापासून सुरक्षित करण्याच्या उद्देशाने मिशन नेत्रा राबवण्यात आले होते.