विधानसभा निवडणुकीत जरी आपल्याला अपयश आले असले तरीही भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा जोमाने काम करून ठाकरे गटाची सत्ता आणू या, असा एकत्रित सूर प्रमुख कार्यकर्त्यांनी आळविला; मात्र मेळाव्याच्या अंतिम टप्प्यात माजी आमदार राजन साळवी यांनी भविष्यात योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईन असे सांगत तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, असे स्पष्ट केल्याने या मेळाव्याला कलाटणी दिली. आज लांजा तालुका शिवसेनेच्या वतीने सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आग्रे हॉल येथे माजी आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत माजी पंचायत समिती सदस्य अनिल कसबले, उपतालुकाप्रमुख सुरेश करंबळे, माजी शिक्षण सभापती चंद्रकांत मंचेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश राजापूर, जिल्हा संघटक रवींद्र डोळस, संजय नवाथे, लीला घडशी आदींसह अन्य प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
मनोगत व्यक्त करत असताना सर्वांनी आपण पुन्हा एकदा ठाकरे गटाची शिवसेना उभी करूया आणि येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरे गटाचे वर्चस्व अबाधित असल्याचे दाखवून देऊया, असे विचार मांडले. शेवटी माजी आमदार राजन साळवी यांनी माझा मी निर्णय केला आहे, कोणाला माझ्याबरोबर यायचं असेल त्यांनी या, असे आवाहन करून बैठक आटोपती घेतली. दरम्यान, भाजप प्रवेशाची बातमी अफवा आहे, असे सांगणाऱ्या माजी आमदार राजन साळवी यांनी चोविस तासांच्या आत लांज्यामध्ये कार्यकर्ता मेळाव्यानंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेणार अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. माजी खासदार व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सचिव विनायक राऊत यांचा उद्या (ता. ५) रत्नागिरी जिल्ह्यात दौरा येत असून या पार्श्वभूमीवर राजकारण तापणार असल्याचे दिसत आहे.
पराभवाला वरिष्ठ मंडळी कारणीभूत – बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना साळवी म्हणाले, ‘प्रसार माध्यमांमध्ये माझ्या प्रवेशाविषयी चर्चा सुरू आहे. याविषयी कार्यकर्त्यांशी संवाद साधावा असा आग्रह मला काही पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्याप्रमाणे राजापूर व लांजा येथे बैठका घेतल्या. काही कार्यकर्त्यांनी तुमच्यावर अन्याय झाल्याचे सांगितले. त्यांनाही मी वेळ येईल तेव्हा भविष्यात योग्य तो निर्णय योग्य वेळी घेईन असे सांगितले. तसेच लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील पराभवाला वरीष्ठ मंडळी कारणीभूत आहेत. त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्याचा शोध वेळीच घेतला नाही तर अन्य व्यक्तीवरही तशीच वेळ येऊ शकते.’