27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्ह्यात ८९ हजार ६४२ पशुपक्षी - शासनाच्या पशुगणना

रत्नागिरी जिल्ह्यात ८९ हजार ६४२ पशुपक्षी – शासनाच्या पशुगणना

मोबाइल अॅपच्या माध्यमातून ही पशुगणना केली जात आहे.

शासनातर्फे दर पाच वर्षांनी केली जाणारी २१वी पशुगणना करण्यात येत आहे. जिल्ह्यात पशुगणना सुरू झाली असून, आतापर्यंत ८९ हजार ६४२ पशुपक्ष्यांची गणना करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक संख्या कोंबड्यांचीच आहे. शेती अणि दुग्ध व्यवसाय कमी असल्याने गायी, म्हैशी आणि बैलांची संख्या खूप कमी आहे. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत दर पाच वर्षांनी राज्यातील पशुगणना करण्यात येते. त्यानुसार २५ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पशुगणना केली जात आहे. चिपळूण पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने केलेल्या नियोजनानुसार, या मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार गाय, म्हैस, वासरे, कोंबड्या, शेळी, मेंढी, घोडे, कुत्री, गाढवे, बदक, आदी १६ प्रजातींच्या नोंदी केल्या जात आहेत.

२१वी पशुगणना १८३ प्रगणक व ४० पर्यवेक्षकांमार्फत सुरू आहे. जिल्ह्यातील १६९० गावांतील ५ लाख ५३ हजार ५८ पैकी ९५ हजार ३५७ कुटुंबांतील ८९ हजार ६४२ पशुपक्ष्यांची गणना करण्यात आली आहे. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. पशुसंवर्धन विभागाची ध्येयधोरणे ठरवणे. दूध, अंडी, मांस आदींच्या उत्पादनामुळे पोषण सुरक्षेसोबत ग्रामीण उपजीविकेलाही चालना मिळते. दरम्यान, पशुगणनेत आतापर्यंत शेतकऱ्यांकडील पाळीव पशुंचाच विचार केला जात होता; मात्र गेल्या काही काळात भटक्या जनावरांचे प्रमाण वाढले आहे. त्या जनावरांची नोंद झाली तर आकडेवारीमध्ये पारदर्शकता येईल. तसेच पुढे योग्य ते धोरण राबवणे शक्य होणार आहे. त्यानुसार या पशुगणनेत पाळीव प्राण्यांसोबत भटक्या प्राण्यांचीही गणना करण्यात येत आहे.

मोबाइल अॅपवरही नोंदणी – आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाइल अॅपच्या माध्यमातून ही पशुगणना केली जात आहे. दुग्ध उत्पादक शेतकरी, पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशुंची अचूक आणि योग्य माहिती द्यावी. पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रांतील कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगरकौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या जनावरांच्या १६ प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular